जल जीवन मिशन कामात दिरंगाई करणारे १४ ठेकेदार काळ्या यादीत; मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली कारवाई
By राजेश भोस्तेकर | Published: October 11, 2023 07:23 PM2023-10-11T19:23:24+5:302023-10-11T19:23:36+5:30
१४ ठेकेदारांकडून २६ योजनांची कामे काढून घेण्यात आली असून, या ठेकेदारांना १ वर्षासाठी काळया यादीत टाकण्यात आले आहे.
अलिबाग : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामांचे कार्यारंभ आदेश मिळून एक वर्षाचा कालावधी उलटून काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. १४ ठेकेदारांकडून २६ योजनांची कामे काढून घेण्यात आली असून, या ठेकेदारांना १ वर्षासाठी काळया यादीत टाकण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केली आहे. यापुढेही कामात दिरंगाई तसेच योग्य पद्धतीने काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात गावागावात पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या योजना, प्रगतीपथावर असलेल्या योजना, घरोघरी नळ जोडणी यांचा तालुकानिहाय आढावा अधिकारी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत घेतला होता.
पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतल्यानंतर आत्ता जिल्हा प्रशासनाने कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार कार्यारंभ आदेश देऊनही एक वर्षांचा कालावधी उलटला तरीही योजनेचे काम सुरू ना करणाऱ्या २६ योजनांचा ठेका रद्द करीत, १४ ठेकेदारांना काळया यादीत टाकण्यात आले आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील १५ योजना असून, कर्जत ३, महाड १, अलिबाग २, उरण ३, मुरुड २ योजनांचा समावेश आहे. या २६ योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पुन्हा निवीदा प्रक्रिया राबविली आहे.
ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत हर घर नल से जल या योजनेमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. जलजीवन मिशनअंतर्गत २०२४ पर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेली कारवाई
तालुका : योजना : ठेकेदार
- पनवेल : आरीवली : पूजा कंट्रक्शन
- पनवेल : महालुंगी : पूजा कंट्रक्शन
- पनवेल : साई : पूजा कंट्रक्शन
- पनवेल : चेरवली : पूजा कंट्रक्शन
- पनवेल : बारापाडा : बेब कंट्रक्शन
- पनवेल : बोर्ले : एस. एन. कंट्रक्शन
- पनवेल : हरिग्राम : पूजा कंट्रक्शन
- पनवेल : पळस्पे : विवेक पाटील
- पनवेल : कसळखंड : राकेश राजू मगर
- पनवेल : केवाळे : पूजा कंट्रक्शन
- पनवेल : रिटघर : निखील कंट्रक्शन
- पनवेल : आजीवली : राकेश राजू मगर
- पनवेल : बारवई : आकाश दशरथ मोरे
- पनवेल : कासप: निखील कंट्रक्शन
- पनवेल : कशेडे खुर्द : निखील कंट्रक्शन
- कर्जत : डोणे : समीर राम लोंगले
- कर्जत : तिवरे : मनस्वी कंट्रक्शन
- कर्जत : जांभवली : समीर राम लोंगले
- महाड : गव्हाडी : गजराई कंट्रक्शन
- अलिबाग : तलवडे : हितेश प्रभाकर ठाकूर
- अलिबाग : देवघर : श्री एंटरप्रायजेस
- उरण : नवघर : गायकर कंट्रक्शन
- उरण : कळवुसरे : रोहन राजेश टेमकर
- उरण : जसखार : रोहन राजेश टेमकर
- मुरुड : तळवली : रोहन राजेश टेमकर
- मुरुड : मोरे : राकेश राजू मगर