मधुकर ठाकूर,उरण : मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनीजेएनपीए बंदरातुन एका ४० फुटी कंटेनरमधुन १४ कोटी ७६ लाखांचा विदेशी सिगारेटचा साठा जप्त केला आहे.
महसूल गुप्तचर संचालनालय (DRI) च्या मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांना तस्करी मार्गाने आणि बनावट मालाच्या नावाने विदेशी सिगारेटचा साठा जेएनपीए बंदरात दाखल होत असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती.या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेएनपीए बंदरातील एका कंटेनर फ्रेट स्टेशन (CFS) येथे पोहोचलेल्या संशयित ४० फुटी कंटेनर ताब्यात घेतले.या तपासणीत या ४० फुटी कंटेनरमध्ये बेकायदेशीररित्या लपवून ठेवण्यात आलेल्या ८६ लाख ३९ हजार विदेशी सिगारेटचा साठा आढळून आला.तस्करी मार्गाने बंदरात आलेल्या या विदेशी सिगारेटची किंमत १४ कोटी ७६ लाखांच्या घरात आहे.
शिपिंग दस्तऐवजांमध्ये मालाची चुकीची घोषणा, बनावट कागदपत्रे तयार करून वस्तूऐवजी सिगारेटचा साठा पॅक केलेले आढळले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील तपासणीत अडथळा येऊ नये यासाठी तुर्तास तरी नावे उघड करता येणार नसल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले