- गिरीश गोरेगावकरमाणगाव : रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके असून, प्रत्येक तालुक्याला एक गटशिक्षण अधिकाºयाची नेमणूक करणे बंधनकारक आहे; परंतु रायगड जिल्ह्यातील केवळ महाड तालुक्याला कायमस्वरूपी गटशिक्षण अधिकारी असून, उर्वरित १४ तालुक्यांना कायमस्वरूपी गटशिक्षण अधिकारी नसल्याने तेथे तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी नेमले आहेत.
माणगाव तालुक्याला गेली १५ वर्षे कायमस्वरूपी कारभारी नसल्याने २००५ पासून प्रभारी गटशिक्षण अधिकारी म्हणून शिक्षण विभागातीलच ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करीत आले आहेत. २००५ पासून दहा प्रभारी शिक्षण विभागाला नाइलाजाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे शिक्षणाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. अशा कारभारामुळे शिक्षण विभागात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांना भोगावा लागत आहे. कायम गटशिक्षण अधिकारी नसल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा दरवर्षी बंद पडत आहेत.
माणगाव तालुक्यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागात १३ केंद्रप्रमुखांच्या जागा रिक्त आहेत. माणगावात २८ केंद्र असून केवळ १५ केंद्रप्रमुख आहेत. तसेच सात कनिष्ठ विस्तार अधिकाºयांपैकी सहा जागा रिक्त आहेत. माणगावमध्ये सात बीट आहेत. मात्र, कर्मचाºयांची वानवा असल्याने या अधिकाºयांवर अधिकचा ताण व कारभार आल्याने वेळेत कामे होण्यास नेहमीच विलंब होत आहे.
२००५ मध्ये गटशिक्षण अधिकारी हे झणझणे होते. त्यानंतर कोकाटे, धोत्रे आणि १२ दिवसांसाठी एस. आर. मोहिते हे होते. २०१४ मध्ये बहुरूपी, २०१५ मध्ये एस. आर. मोहिते, २०१६ मध्ये बी. व्ही. काप, २०१८ मध्ये पुन्हा एस. आर. मोहिते, आॅक्टोबर २०१९ मध्ये शुभांगी नाखले तर २०१९ पासून ते आजपर्यंत एस. ए. चांदोरकर-पालकर या काम पाहत आहेत. सातत्याने वेगवेगळ्या अधिकाºयांकडे प्रभारी गटशिक्षण अधिकाºयांची नियुक्ती केल्याने शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विभागात नेहमीच अडथळे निर्माण होत आहेत. यासंदर्भात शिक्षण अधिकारी प्राथमिक नितीन मंडलीक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
माणगाव तालुक्यात शाळा बंद पडण्याचे प्रमाण वाढले; ६०८ शिक्षकांऐवजी ५८६
माणगाव तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका आहे. मात्र, ६०८ शिक्षकांऐवजी केवळ ५८६ शिक्षकांची नेमणूक झाली आहे. त्यातील काहींना दोन शाळांचे काम पाहवे लागते. काही शाळांना पहिली ते चौथीपर्यंत एकच शिक्षक ज्ञानार्जन करीत असतो. तोच शिक्षक इतर सर्व प्रकारची कामे करीत असतो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातही इतर तालुक्यांप्रमाणे शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. याचा गंभीर विचार केल्यास विद्यार्थ्यांची हेळसांड आणि परवड न होता विद्यार्थ्यांची गळती थांबण्यास मदत होईल. तसेच त्यांना हक्काचे शिक्षण मिळून ‘सब पढो, सब आगे बढो!’ हा नारा यशस्वी होईल. ही रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
शिक्षकांवर अतिरिक्त ताण
माणगाव तालुक्यात मराठी शाळांना शालेय पोषण आहार दिला जातो. मात्र, अधीक्षक हे पद रिक्त आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यास गैरसोयीचे होत आहेत. त्याचा अतिरिक्त ताण शाळेतील शिक्षकांवर व केंद्रप्रमुखांवर पडत आहे. त्याचा हिशोब ठेवणे हे एक जिकिरीचे आणि कटकटीचे काम आहे. तेही काम शिक्षकच करीत असतात. तसेच पदोन्नती मुख्याध्यापक हे पद, पदवीधर शिक्षक-पाच, उपशिक्षक-चार अशी व इतर पदेही रिक्त आहेत. माणगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागात तीन वर्षे कार्यालय साहित्य व स्टेशनरी दिली गेलेली नाही, तसेच प्रवास भत्ते बिले मिळालेली नाहीत. या सर्व अडचणी शिक्षण विभागाने सोडवाव्यात, अशी मागणी विविध संघटनांतर्फे करण्यात आली आहे.