ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात 14 सेवा दवाखाने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 11:40 AM2022-09-20T11:40:38+5:302022-09-20T11:41:05+5:30

कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा निर्णय तिन्ही जिल्ह्यांत जागांचा शोध सुरू

14 service clinics in Raigad district including Thane, Palghar | ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात 14 सेवा दवाखाने

ठाणे, पालघरसह रायगड जिल्ह्यात 14 सेवा दवाखाने

googlenewsNext

नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात १४ ठिकाणी सेवा दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळाने तिन्ही जिल्ह्यात या सेवा दवाखान्यांसाठी जागांचा शोध सुरू केला आहे. यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत जागा मालकांकडून महामंडळाने  प्रस्ताव मागविले  आहेत.

महामंडळाच्या जूनमध्ये झालेल्या १८८ व्या बैठकीत देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. 
यात महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथे सहा रुग्णालये उभारणार असल्याचे सांगितले होते. याच बैठकीत महाराष्ट्रात ४८ ठिकाणी दवाखाने सुरू करण्याचेही घोषित केले होते. त्यात १४ दवाखाने ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील आहेत. या दवाखान्यात विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना निवासस्थानाच्या जवळच्या परिसरात दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्याचा असणार प्रयत्न आहे. 

येथे सुरू करणार सेवा दवाखाने

रबाळे, महापे, तुर्भे, नेरूळ, सरावली, डाेंबिवली, वसई, खारघर, पेण, तळोजा, रोहा, न्हावा-शेवा, उरण आणि  खालापूर अशा १४ ठिकाणे दवाखाने सुरू करणार आहेत. यातील सात दवाखाने नवी मुंबई-उरण परिसरातील आहेत.

 महामुंबई परिसरात राज्य कामगार विमा योजनेची वरळी, कांदिवली, मुलुंड, ठाणे, उल्हासनगर आणि वाशी येथे रुग्णालये आहेत. मात्र, आता ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील औद्योगिक वसाहतींच्या परिसरातच सेवा दवाखाने सुरू होणार आहेत. यामुळे कामाच्या ठिकाणीच वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहेत.

 सर्व भागांतील विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना, आयुष्मान भारत पीएमजेएवाय संलग्नीकृत रुग्णालयांद्वारे रोकड विरहित (कॅशलेस) वैद्यकीय सेवांचा लाभ देण्याचा निर्णयही यापूर्वीच झाला आहे.

यातील प्रत्येक दवाखान्यासाठी १,६०० चौरस फूट जागेचा शोध महामंडळाने सुरू केला आहे. याठिकाणी प्रत्येकी दोन डॉक्टर राहणार आहेत. तळमजल्यावरील जागेला प्राधान्य असून जागा मालकासोबत किमान तीन वर्षांचा करारनामा करण्यात येणार आहे. 

Web Title: 14 service clinics in Raigad district including Thane, Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.