अलिबाग : हिराकोट किल्ल्यातील रायगड जिल्हा कारागृहातील बंदिजनांकरिता योगाभ्यासाचे वर्ग घेणारे ठाण्यातील निकम गुरुजींनी स्थापन केलेल्या श्री अंबिका योग कुटीरच्या अलिबाग शाखेचे योग शिक्षक वीरेंद्र पवार यांनी याच कारागृहात सुरू केलेल्या शारदोत्सव उपक्रमास यंदा चौदा वर्षेपूर्ण होत आहेत.आपल्या एखाद्या चुकीमुळे गुन्हा केल्याने कारागृहात येणारे बंदिजन त्याचा पश्चात्ताप करीत असतात. अशा परिस्थितीत त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, त्याचे विपरीत परिणाम त्याच्या निष्पाप कुटुंबीयांना भोगावे लागू नये, यासाठी बंदिजनांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणण्याच्या हेतूने तसेच कारागृहातून मुक्त झाल्यावर पुन्हा एक नवे आयुष्य जगण्याची उमेद देऊन एक चांगला नागरिक म्हणून समाजाने त्यास स्वीकारावे अशा दृष्टिकोनातून गेल्या बावीस वर्षांपासून अलिबागमधील हिराकोट जिल्हा कारागृहात योग शिक्षक वीरेंद्र पवार हे बंदिजनांकरिता मोफत योगाभ्यास वर्ग घेत आहेत.बंदिजनांच्या मानसिक परिवर्तनाकरिता काही वैचारिक मंथन झाले तर परिवर्तनाची ही प्रक्रि या अधिक गतिमान होऊ शकेल अशा विश्वासातून त्यांनी कारागृह प्रशासनाबरोबर चर्चा करून बंदिजनांकरित शारदोत्सव उपक्रम करण्याची अभिनव कल्पना मांडली. तत्कालीन कारागृह प्रशासनाने देखील या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सन २००४ मध्ये या अनोख्या शारदोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली.पवार यांनी बंदिजनांसाठीच्या या आगळ््या शारदोत्सवाकरिता अत्यंत विचारपूर्व विशेष नियोजन केले आहे. आपल्याच समाजात असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना हिराकोट कारागृहात निमंत्रित करून त्यांचा संवाद बंदिजनांबरोबर साधून देण्याचे हे नियोजन आहे. मान्यवरांना पवार त्यांच्या समोरचा श्रोतृवृंद नेमका कोण आहे, त्यांची मानसिकता काय असते, बोलताना कोणती पथ्ये पाळावी हे सांगतात. परिणामी, वक्त्यांना कार्यक्रमाची नेमकी कल्पना येते.विविध क्षेत्रातील मान्यवरांना कारागृहातील या शारदोत्सवात निमंत्रित करण्याचा दुसरा आणि महत्त्वाचा हेतू म्हणजे कारागृहातून बंदिजन बाहेर पडून पुन्हा समाजात आल्यावर समाजातील हे काही मान्यवर घटक त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात मार्गदर्शक म्हणून उपयुक्त ठरावेत असा आहे. गेल्या १५ वर्षांत हा हेतू साध्य झाल्याचा पवार यांचा अनुभव आहे.