रामजन्मोत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा

By admin | Published: April 16, 2016 01:14 AM2016-04-16T01:14:06+5:302016-04-16T01:14:06+5:30

जीवनाचे सार सांगणाऱ्या ‘श्रीरामायण’ या ग्रंथाचे नायक, आदर्श पुत्र-पती-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व या गुणांच्या आदर्शामुळे हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत

150 years of Ramjanmotsav tradition | रामजन्मोत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा

रामजन्मोत्सवाला दीडशे वर्षांची परंपरा

Next

अलिबाग : जीवनाचे सार सांगणाऱ्या ‘श्रीरामायण’ या ग्रंथाचे नायक, आदर्श पुत्र-पती-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व या गुणांच्या आदर्शामुळे हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामांचा चैत्र शुद्ध नवमी हा जन्मदिवस सर्वत्र अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील ८९ श्रीराम मंदिरांमध्ये श्रीरामजन्मोत्सव सोहळ््याचे आयोजन शुक्रवारी दुपारी बारा वाजता सर्वत्र करण्यात आले होते, तर याच मंदिरांतील श्रीरामांच्या ८९ पालख्या गाव-शहरांत परंपरेनुसार संध्याकाळी उशिरा आयोजित करण्यात आल्या होत्या.
यामध्ये जिल्ह्यातील सर्वांत आगळे वैशिष्ट्य अलिबागमधील १५० वर्षांच्या प्राचीन श्रीराम जन्मोत्सव सोहळ््याच्या निमित्ताने अनुभवण्यास मिळते आणि या त्यांच्या प्राचीनत्वामुळेच हा अलिबागचा रामजन्मोत्सव सर्वदूर प्रसिध्द आहे. अलिबाग शहराचाच भाग असलेल्या रामनाथ येथे पारेख कुटुंबीयांचे श्रीराम मंदिर आहे तर अलिबाग शहरातील ब्राम्हणआळीमध्ये मराठे गुरुजींनी स्थापना केलेले राम मंदिर आहे. ही दोन्ही मंदिरे १५० वर्षांची प्राचीन मंदिरे आहेत. रामनाथ येथील श्रीराम ‘मोठा’ तर ब्राम्हणआळीतील श्रीराम ‘धाकटा’ अशी प्राचीन ओळख या उभय श्रीरामांची असल्याचा इतिहास ब्राम्हणआळी श्रीराम मंदिराचे विश्वस्त बाळकृष्ण नारायण जोशी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
या दोन्ही राममंदिरांत गेल्या १५० वर्षांपासून रामजन्मोत्सव सोहळा गुढीपाडवा ते रामनवमी असा नऊ दिवस साजरा करण्यात येतो. नऊ दिवस कीर्तनाचे आयोजन करण्यात येते. यंदा ब्राम्हणआळी श्रीराम मंदिरात तळेगाव-पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प. शेखरबुवा व्यास यांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांनी घेतला. शुक्रवारी रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता श्रीरामजन्मोत्सवाच्या कीर्तनासह जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 150 years of Ramjanmotsav tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.