रायगडमधील १५०० गावे अद्याप अंधारातच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:50 AM2020-06-08T02:50:13+5:302020-06-08T02:50:23+5:30

चार दिवसांपासून नागरिकांचे हाल : १४ हजार विजेचे खांब पडल्याने मोठा फटका

1500 villages in Raigad are still in darkness | रायगडमधील १५०० गावे अद्याप अंधारातच

रायगडमधील १५०० गावे अद्याप अंधारातच

Next

आविष्कार देसाई ।

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळानेरायगड जिल्ह्याला जबरदस्त तडाखा दिल्याने केवळ दोनच तासांत होत्याचे नव्हते झाले. वादळाचा विध्वंस इतका भयानक होता, की लाखो घरे पत्यांंप्रमाणे कोलमडून जमीनदोस्त झाली. १४ हजार विजेचे खांब जमिनीतून उखडून बाहेर आले आहेत. अद्याप १५०० गावांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. अन्नधान्य आणि पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहेत. सरकारने तातडीने याची दखल घेत रायगडचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यास युध्दपातळीवर काम करण्याची अपेक्षा व्यक्त
होत आहे.

सरकारने रायगडकरांच्या जखमेवर १०० कोटी रुपयांची फुंकर घातली असली, तर रायगडाला पूर्वपदावर यायला बराच अवधी लागणार आहे. तब्बल सव्वाशे वर्षांनी चक्रीवादळाने रायगडला पुन्हा एकदा जबरदस्त आघात केला आहे. वादळाचा तडाखा इतका भयानक होती की, प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, पेण, रोहे, श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा या सात तालक्यासह तळा, पोलादपूर, सुधागड, महाड, खालापूर, कर्जत, उरण, पनवेल तालुक्यातील हजारो घरे जमिनदोस्त झाली. घरांचे पत्रे, घरांचे छप्पर कापसासारखे वादळात उडून गेले. दोन तासांच्या वादळी तांडवामुळे विजेचे पोल जमिनीतून उखडून खाली कोसळले. विजेच्या तारांवर महाकाय वृक्ष पडल्याने त्या जमिनीवर लोंबकळू लागल्या. सोसाट्यांचा वारा आणि सोबतीला जोरदार पावसामुळे निसर्गाच्या रौद्ररुपाचे दर्शन अंगावर काटा उभे करणारे होते. काही ठिकाणी शाळांच्या इमारतीही पडल्या आहेत.
वादळानंतर जिल्ह्यातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. त्यांनी घराबाहेर पडत वादळाने आणलेला प्रलय आपल्या डोळ्यांनी पाहिला. कोणाच्या घरांचे छप्पर उडाले, तर कोणाची घरे जमीनदोस्त झाली होती. गोठे पावसाच्या पाण्यात वाहून गेले होते. नुकसानग्रस्तांपैकी कोणी घरे गमावली, काहींनी घरांचे छप्पर काहींनी तर आपल्या कुटूंबातील व्यक्ती गमावल्या. आता मदतकार्य सुरू आहे. पण पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. शहरे आणि निमशहरांमध्ये सोसायट्यांनी जनरेटर भाड्याने आणून पाणी इमारतीवरील टाकीत सोडले आहे. त्यामुळे तेथील प्रश्न मिटला आहे. लाईट नसल्याने मोबाइल बंद, मोबाईल टॉवरही बंद असल्याने अद्यापही संपर्क साधण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

आर्थिक उत्पन्नाचे साधन नाही
च्वादळानंतर सामानाची आवरा-आवर सुर करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरु आहे. जमिनदोस्त झालेली घरे पुन्हा उभी करणे हे त्यांच्या समोर फार मोठे आव्हान आहे. घरातील असलेले अन्न-धान्य भिजल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
च्सर्वसामान्यांचे उद्योगधंदे, व्यवसाय वादळामुळे बंद झाले आहेत. आर्थिक उत्पन्नाचे कोणतेच साधन उपलब्ध नाही. त्यामुळे सरकारने या नुकसानग्रस्तांच्या हिताचे निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे.

३१६ गावांमध्ये वीज सुरळीत
जिल्ह्यात एकूण एक लाख ११ हजार ४३२ घरांची पडझड झाली आहे, तर १४ हजार ७०५ विजेचे पोल, तारा पडल्या आहेत. १९०५ गावांमध्ये वीज खंडीत झाली होती, त्यापैकी ३१६ गावांमध्ये पुन्हा वीज सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र , १५८९ उर्वरीत गावे अद्यापही अंधारातच चाचपडत आहेत.
निसर्ग चक्रीवादळामुळे घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेचे खांब, वीज वाहक तारा यांचेही नुकसान झाले आहे. शेती, बागायतींना मोठा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरु करण्याची प्रक्रीया युध्दपातळीवर करण्यात आली आहे.
- पद्मश्री बैनाडे, निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: 1500 villages in Raigad are still in darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.