रायगड जिल्ह्यात १५७८ कारखाने प्रदूषणकारी, भाताच्या कोठारात रासायनिक आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 06:50 AM2018-04-04T06:50:34+5:302018-04-04T06:50:34+5:30

भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असा रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित केल्यावर शेकडो रासायनिक कारखाने रायगड जिल्ह्यात आले. भाताच्या कोठारावर कारखान्यांचे आक्रमण होवून परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, मात्र...

1578 factories polluted in Raigad district, chemical attack in paddy field | रायगड जिल्ह्यात १५७८ कारखाने प्रदूषणकारी, भाताच्या कोठारात रासायनिक आक्रमण

रायगड जिल्ह्यात १५७८ कारखाने प्रदूषणकारी, भाताच्या कोठारात रासायनिक आक्रमण

googlenewsNext

- जयंत धुळप
अलिबाग - भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असा रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित केल्यावर शेकडो रासायनिक कारखाने रायगड जिल्ह्यात आले. भाताच्या कोठारावर कारखान्यांचे आक्रमण होवून परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या, मात्र वाढत्या प्रदूषणाचा फटका रायगडवासीयांना बसू लागला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०१६-१७ मधील उद्योगांच्या प्रदूषण निर्देशांकानुसार जिल्ह्यात ६० किंवा त्यापेक्षा अधिक अशा ‘लाल’रंगश्रेणी प्रदूषण निर्देशांक असलेल्या उद्योगांची संख्या तब्बल ६३४ आहे. यामध्ये १७५ मोठे उद्योग, ३१ मध्यम उद्योग तर ४२८ लहान उद्योगांचा समावेश आहे.
४१ ते ५९ दरम्यानच्या ‘नारंगी’ रंगश्रेणी प्रदूषण निर्देशांक असलेल्या उद्योगांची संख्या जिल्ह्यात एकूण ४७७ आहे. त्यामध्ये ८८ मोठे, ३४ मध्यम तर ३५५ लहान उद्योग आहेत. २१ ते ४० दरम्यानच्या ‘हिरवा ’ रंगश्रेणी प्रदूषण निर्देशांक असलेल्या उद्योगांची संख्या जिल्ह्यात एकूण ४६७ आहे. त्यामध्ये एकही मोठा उद्योग नाही, याचाच दुसरा अर्थ मोठे सर्व उद्योग प्रदूषणकारी असल्याचे स्पष्ट होते. २० मध्यम आणि ४४७ लहान उद्योग या ‘हिरव्या’ रंगश्रेणीमध्ये आहेत.
मुंबई शहरात रासायनिक कारखान्यांतून होणारे प्रदूषण गंभीर स्वरुपाचे झाल्यावर सुमारे ४० वर्षांपूर्वी मुंबईतील रासायनिक कारखाने मुंबई बाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला. मुंबईस खेटूनच असलेल्या रायगड जिल्ह्यात हे रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला.
उद्योजकांनी आपले कारखाने रायगड जिल्ह्यात स्थलांतरित करावेत याकरिता विशेष प्रोत्साहन योजना देखील त्यावेळी अमलात आणण्यात आली. रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. त्यातूनच रायगड जिल्ह्यात रसायनी ही पहिली औद्योगिक वसाहत जन्माला आली.
मुंबईतून रायगडमध्ये आलेले विविध रासायनिक कारखाने आणि नव्याने थेट रायगडमध्ये आलेले रासायनिक कारखाने यातून एकीकडे रोजगार निर्माण झाला, मात्र त्याकरिता प्रदूषणाची मोठी किंमत रायगडला मोजावी लागली आहे.

नद्यांच्या जलप्रदूषणातून जलदुर्भिक्षाच्या समस्येचा जन्म

रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा, गाढी, अंबा, कुंडलिका,सावित्री आदी प्रमुख नद्यांच्या किनारी तळोजा, पनवेल, रसायनी, रोहा, महाड या महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या महाकाय औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आणि त्यात हे सारे रासायनिक कारखाने आले.

रासायनिक कारखान्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी पिण्याच्या पाण्याचा नैसगिक स्रोत असणाऱ्या या नद्यांच्या पाण्यात सोडण्यात आल्याने या नद्या कायमस्वरुपी प्रदूषित होवून, पाण्याचे दुर्भिक्ष जिल्ह्यात निर्माण झाले.

दरम्यान, याच नद्यांवर बांधण्यात आलेल्या धरणांतील पिण्याचे पाणी अधिक प्रमाणात जिल्ह्यात आलेल्या रासायनिक कारखान्यांनाच देण्यात आल्याने जिल्ह्यातील दुबार शेतीला पाणी मिळण्याचे शेतकºयांचे स्वप्न विरुन गेले. शासनाला दरवर्षी उन्हाळ््यात कोट्यवधी रुपये खर्च करुन पिण्याचे पाणी नदी किनारच्या गावांमध्ये उपलब्ध करुन द्यावे लागले.

जिल्ह्यात वायू प्रदूषणाचे प्रमाणदेखील मोठे
जलप्रदूषणाबरोबरच जिल्ह्यात वायू प्रदूषणाचे प्रमाणदेखील मोठे आहे. या वायू प्रदूषणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील भातशेतीसह भाजीपाला, आंबा, नारळ, सुपारी या प्रमुख पिकांवर होत असल्याचा निष्कर्ष प्रयोगशील शेतकरी महेश्वर देशमुख यांचा आहे.

Web Title: 1578 factories polluted in Raigad district, chemical attack in paddy field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.