अंतिम लढतीसाठी १६ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 11:51 PM2019-04-08T23:51:43+5:302019-04-08T23:52:10+5:30
रायगड लोकसभा मतदारसंघ : २४ पैकी ८ उमेदवारांचे अर्ज मागे; २३ एप्रिलला होणार मतदान
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २४ उमेदवारांपैकी आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. यामुळे आता निवडणूक रिंगणात १६ उमेदवार अंतिम असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. रायगड लोकसभा मतदार संघात मतदान मंगळवार २३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.
आता निवडणूक रिंगणात असलेल्या १६ उमेदवारांमध्ये अनंत गंगाराम गीते (शिवसेना), सुनील दत्तात्रेय तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), नथुराम भगुराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी ),सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी),मिलिंद भागुराम साळवी (बहुजन समाज पार्टी ), मधुकर महादेव खामकर (अपक्ष),संदीप पांडुरंग पार्टे (बहुजन महा पार्टी), सुनील सखाराम तटकरे (अपक्ष),सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष),संजय अर्जुन घाग (अपक्ष), गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्र ांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके, (भारतीय किसान पार्टी),अविनाश वसंत पाटील, (अपक्ष), सुनील पांडुरंग तटकरे(अपक्ष),योगेश दीपक कदम (अपक्ष) आणि मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे हे दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, १५ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्यावर दोन मतदान यंत्रे (बॅलेट युनिट) वापरण्याचा निवडणूक आयोगाचा नियम असल्याने रायगडमधील या १६ उमेदवारांची फोटोसह नावे पहिल्या मतदान यंत्रावर असतील तर केवळ ‘नोटा’ पर्याय हा दुसऱ्या मशिनवर प्रथम क्रमांकावर असेल.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या आठ उमेदवारांमध्ये रामदास दामोदर कदम (अपक्ष), विलास गजानन सावंत (महाराष्ट्र क्र ांती सेना),संजय अनंत पाशिलकर (बळीराज पार्टी),अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष),अनिल बबन गायकवाड (अपक्ष),अशोक दाजी जंगले(अपक्ष),श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष),सचिन भास्कर कोळी,( वंचित बहुजन आघाडी) यांचा समावेश आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात १ हजार २२० अंध(क्षीण दृष्टी)मतदार आहेत. रायगड लोकसभा मतदार संघातील गुहागर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ५९९ अंध (क्षीण दृष्टी)मतदार आहेत तर उर्वरित पेण विधानसभा मतदार संघात १३३, अलिबाग विधानसभा मतदार संघात ११७, श्रीवर्धनमध्ये १७५ तर दापोली ४३ अंध(क्षीण दृष्टी)मतदार आहेत. या मतदारांकरिता अंधासाठी कार्यरत अधिकृत ‘नॅब’ संस्थेच्या सहयोगाने बे्रल लिपीतील मतदान स्लिप, मतदान पत्रिका प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येणार असून मतदान यंत्रावर देखील ब्रेल लिपीत उमेदवार नाव, पक्ष, चिन्ह आदी माहिती उपलब्ध राहाणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.
७, ७३६ दिव्यांगांसाठी ६७३ व्हीलचेअर्स
रायगड लोकसभा मतदार संघात एकूण ७ हजार ७३६ दिव्यांग मतदार आहेत, त्यांच्या सोयीसाठी ६७३ व्हील चेअर्सचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत ३०० व्हील चेअर्स प्रत्यक्ष नियोजित ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उर्वरित व्हीलचेअर्स येत्या काही दिवसांत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मतदान केंद्र रु ग्णवाहिका कक्षेत
च्नुकताच हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रु ग्णवाहिका, मेडिकल कीट, वैद्यकीय उपचार यांची सोय करण्यात आली असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका देखील नियुक्त करण्यात येतील. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अजित गवळी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई यांना देखील याबाबतीत सूचना दिल्या आहेत. गरज भासल्यास मतदारास तत्काळ वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रायगड लोकसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्र १०८ रु ग्णवाहिका वा खासगी रुग्णवाहिकेच्या कक्षेत राहाणार असून गरज भासल्यास केवळ २० मिनिटात रुग्णवाहिका मतदान केंद्रावर पोहोचेल असे नियोजन केले असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.