तोंडसुरेत दोन दिवसांत १६ गुरांचा मृत्यू
By admin | Published: March 30, 2017 06:52 AM2017-03-30T06:52:59+5:302017-03-30T06:52:59+5:30
तालुक्यातील मौजे तोंडसुरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून तब्बल १६ गुरे मृत्युमुखी पडल्याने परिसरात घबराट
उदय कळस / म्हसळा
तालुक्यातील मौजे तोंडसुरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांपासून तब्बल १६ गुरे मृत्युमुखी पडल्याने परिसरात घबराट पसरली आहे; परंतु तालुका पशुधन अधिकाऱ्यांच्या पाहणीनुसार हवामानातील होणाऱ्या बदलामुळे मोकाट फिरणाऱ्या जनावरांनाच याचा त्रास होतो. त्यामुळे जनावरे सकाळी चरून आल्यावर गोठ्यात बांधून ठेवणे हाच उपाय असल्याचे सांगितले. तसेच उपाय सांगूनदेखील गावकरी हलगर्जी करुन जनावरांना मोकाट सोडत असल्याची खंत व्यक्त केली.
गेल्या दोन दिवसांपासून तोंडसुरे व आजूबाजूच्या परिसरात गुरांच्या मृत्यूचे प्रमाण अचानक वाढले, त्यामुळे तब्बल १६ जनावरांचा मृत्यू झाला. गायी, बैल, वासरू यांचा यामध्ये समावेश होता. गुरांच्या या मृत्यूमुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान होऊन भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर ग्रामस्थांनी तालुका पशुधन अधिकाऱ्यांशी संपर्क करून घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे पुढील हालचाली करत, डॉ. पी. डी. पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून गुरांच्या उपचारास सुरुवात केली. मात्र, आवश्यक असलेल्या औषधांचा साठा उपलब्ध नसल्याने एकाच प्रकारचे इन्जेक्शन गुरांना देण्यात आले. हे उपचार केल्यानंतर डॉक्टर पुन्हा गावात येईपर्यंत गुरे मृत्युमुखी पडली असल्याचे, तोंडसुरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मनोज नाक्ती यांनी सांगितले. अशा गुरांच्या मृत्यूमुळे बळीराजाचे आर्थिक नुकसान झाल्याने याची नुकसानभरपाई रायगड जिल्हापरिषदेकडून मिळावी, अशी मागणी तोंडसुरे सरपंच नाक्ती व ग्रामस्थांनी उपसभापती मधुकर गायकर यांची भेट घेऊन केली.
शेतकऱ्यांना आवाहन
आपली गुरे मोकाट सोडून जनावरांंवर संकट ओढवून घेऊ नका. गुरांना गोठ्यातच बांधून त्याचठिकाणी चारा व पाणी देऊन गुरांची निगा राखा. गुरांवर काही परिणाम जाणवत असेल तर ताबडतोब तालुका पशुधन आरोग्य अधिकाऱ्यांना कळविल्यास उपचार होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी वेळ न दवडता तालुका कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या पाळीव जनावरांना मृत्यूपासून वाचवा. या रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मिनरल मिक्स्चर दिले पाहिजे, यामुळे क्षार व जीवनसत्त्वे यांचे प्रमाण संतुलित होऊन, गुरांना या रोगाचा प्रादूर्भाव होत नाही.
- डॉ. एस.बी. शहा, पशुधन विकास अधिकारी, म्हसळा
तोंडसुरे येथील जनावरांची मृत्यू मालिका हा प्रकार गंभीर आहे. पशुवैद्यकीय पथक तोंडसुरे येथे पोहोचेल व दोन दिवसांत जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अलिबाग यांचे पथक रक्त नमुने घेण्यासाठी येणार आहे.
- डॉ .आर.आर. लालगे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.परिषद
म्हसळा तालुका पशुवैद्यकीय विभागात पंचायत समिती पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती पशुधन पर्यवेक्षक, ड्रेसर पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १, पशुधन शिपाई, संदेरी अशी अनेक पदे रिक्त आहेत, याबाबत जिल्हा परिषदकडे पाठपुरावा करणार.
- मधुकर गायकर, उपसभापती, म्हसळा