१६ कोटींची थकबाकी, महावितरणची धडक कारवाई; रायगड जिल्ह्यातून १ हजारांहून गावात अंधार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:39 AM2021-03-24T00:39:20+5:302021-03-24T00:39:34+5:30
ग्रामीण भागात झाला काळोख; पथदिवे बंद : कर्जत तालुक्यात महावितरणची १६ कोटींची थकबाकी
कर्जत : ग्रामीण भागातील रस्त्यांवरील रात्रीच्या वेळी अंधार दूर करणारे पथदिवे गेले काही दिवस बंद आहेत. रायगड जिल्हा परिषदेने त्या पथदिव्यांच्या बिलाची थकबाकी रक्कम भरली नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडित केल्याने सर्व पथदिवे बंद आहेत. दरम्यान, नेरळसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये पथदिव्यांवरून राजकारण तापले असून कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमधील महावितरण कंपनीची थकबाकीची रक्कम तब्बल १६ कोटींच्या घरात आहे.
ग्रामीण भागातील पथदिव्यांचा पथकर ग्रामपंचायत कराच्या पावतीत समाविष्ट असतो, मात्र त्या पथदिव्यांचे वीज बिल रायगड जिल्हा परिषद भरते. त्या वीज बिलाची कोटींच्या घरातील थकबाकी महावितरण कंपनीकडे रायगड जिल्हा परिषदेने जमा केली नाही. त्यामुळे १५ मार्च रोजी महावितरण कंपनीने रायगड जिल्ह्यातील १ हजार ९० ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्या काळोखाने जिल्ह्यात गावागावात राजकारण तापले असून, नेरळ या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीमधील पथदिवे राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. मोठी लोकवस्ती, नागरीकरण आणि मोठी बाजारपेठ यामुळे नेरळ ग्रामपंचायतीला महत्त्व आहे; मात्र त्याच नेरळ ग्रामपंचायतीमधील विजेचे पथदिवे रायगड जिल्हा परिषदेने बंद केल्याने नेरळ ग्रामपंचायत टीकेची धनी झाली आहे.
नेरळ ग्रामपंचायतीने जाहीर फलक लावून पथदिव्यांचे बिल रायगड जिल्हा परिषद भरते. त्यांनी वीज बिल भरले नसल्याने पथदिवे बंद आहेत, असे जाहीर निवेदन दिले आहे. परिणामी येथील सोशल मीडिया ग्रुपवर नेरळमधील राजकारण तापले असून नेरळ ग्रामपंचायत कसा भ्रष्टाचार करीत आहे आणि त्यात रस्त्यावरील दिव्यांच्या मुद्द्याचा भर पडला आहे. दुसरीकडे कर्जत तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींमधील विजेची थकबाकी तब्बल १६ कोटींपर्यंत गेली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या पथदिव्यांची वीज महावितरणने खंडित केली आहे, मात्र त्या वेळी महावितरणला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर विजेच्या खांबांवर २४ तास विजेचे दिवे सुरू असल्याचे लक्षात आले. त्या दिव्यांवरही महावितरणने कारवाई करीत थकबाकी भरा आणि विजेचा पुरवठा सुरू करा, अशी भूमिका घेतली आहे.
आम्ही आठ महिन्यांपूर्वी रायगड जिल्हा परिषदेशी पथदिव्यांच्या वीज बिलाबाबत चर्चा केली होती. त्यांना मागील थकबाकी तुम्ही भरा, पुढचे चालू बिल आम्ही भरतो, असे सांगितले होते, मात्र आतापर्यंत जिल्हा परिषदने वीज बिल थकबाकी भरली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच वेळी विरोधक अर्धवट माहितीच्या आधारे पथदिव्यांचे वीज बिल भरले नाही म्हणून आमच्यावर आरोप करीत आहेत.- रावजी शिंगवा, सरपंच, नेरळ
आमच्या मुख्य कार्यालयाकडे ग्रामीण भागातील रस्त्यावर असलेल्या पथदिव्यांच्या विजेच्या बिलापोटी थकबाकीची रक्कम रायगड जिल्हा परिषदेने भरलेली नाही. त्यात सध्याच्या महिन्यापर्यंतची थकबाकी पाहिली असता ती १६ कोटींपेक्षा जास्त आहे. जोपर्यंत शासन स्तरावर निर्णय होऊन जिल्हा परिषदेकडून थकबाकीची रक्कम भरली जात नाही, तोपर्यंत पथदिव्यांची वीज पूर्ववत होणार नाही. - गणेश देवके, उपअभियंता, महावितरण, कर्जत