अलिबाग : ढगफुटीनंतर केदारनाथमध्ये हजारो यात्रेकरू अडकले आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील १६ ते १७ जणांचा समावेश आहे. दरम्यान, या संकट काळात स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही, असा आरोप जिल्ह्यातील यात्रेकरूंनी केला आहे.
केदारनाथमधील संकटानंतर शुक्रवारी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने महाराष्ट्रातील काही यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलविण्यात असले, तरी उर्वरित यात्रेकरूंचे खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. आम्हाला येथून सुरक्षित बाहेर काढा, अशी याचना यात्रेकरू करीत आहेत. अडकलेल्या यात्रेकरूमध्ये महाडमधील उद्योजक गोपाळ मोरे यांचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की, महाडचे आमदार भरत गोगावले आणि त्यांचे पुत्र विकास गोगावले यांनी यात्रेकरूंच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले; परंतु, इथले सरकार आणि प्रशासन त्याला प्रतिसाद देत नाही. रायगड जिल्ह्यातील अडकलेल्या यात्रेकरूंमध्ये महाडमधील काही जणांचा समावेश असल्याची माहिती मोरे यांनी दूरध्वनीवरून दिली.