खालापूर : तब्बल एक कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी सावरोली ग्रामपंचायतीच्या तब्बल १७ फाइल्स जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर काही महिला सदस्यांवर मात्र अद्याप कारवाई झालेली नाही.खालापूर तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत असणाऱ्या सावरोलीच्या कारभारावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष बैलमारे यांनी अनेकदा आवाज उठला होता. अधिवेशनात आमदार सुनील तटकरे यांनी कारवाईबाबत प्रश्न विचारल्यानंतर भ्रष्टाचाराविरोधात कारवाई सुरू झाली. या प्रकरणी खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सरपंच सरिता मुकणे, उप सरपंच प्रवीण बैलमारे, सदस्य संतोष घोसाळकर, नरेंद्र तटकरे यांना अटक करण्यात आली असून, ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान, घोटाळ्यातील आरोपी तेजल बारड, वृषाली पाडगे, ज्योती उद्देश पवार व उषा घोसाळकर, जयश्री पाटील, या महिला सदस्यांवर अटकेची तलवार कायम आहे. त्यांना अजून अटक करण्यात आली नाही, तर ग्रामसेवक गणेश किसन शिंदे हेही फरार आहेत.
घोटाळ्याप्रकरणी १७ फाइल्स जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 2:25 AM