१७१ गावांमध्ये पाणीटंचाई?

By Admin | Published: March 31, 2016 02:42 AM2016-03-31T02:42:08+5:302016-03-31T02:42:08+5:30

पेण खारेपाटासह तालुक्याच्या इतर गाववाड्यांमध्ये यावर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण जनतेला बसत आहेत. पाण्यासाठी वाशी खारेपाटासह मसद-शिर्की परिसरातील वाडीवाल्यांवर

171 water shortage in villages? | १७१ गावांमध्ये पाणीटंचाई?

१७१ गावांमध्ये पाणीटंचाई?

googlenewsNext

- दत्ता म्हात्रे,  पेण

पेण खारेपाटासह तालुक्याच्या इतर गाववाड्यांमध्ये यावर्षी डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण जनतेला बसत आहेत. पाण्यासाठी वाशी खारेपाटासह मसद-शिर्की परिसरातील वाडीवाल्यांवर यावर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. पेण पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणार्थ केलेला कृती आराखडा तब्बल १ कोटी ८४ लाख रुपयांचा असून कागदावरची ही प्रतिबंधात्मक उपाययोजना कृतीमध्ये सपशेल फेल ठरली आहे. पेणच्या शिवारातील आंबेघर व हेटवणे धरणात ७० टक्के पाणीसाठा शिल्लक असूनदेखील राजकीय अनास्थेपोटी पेणची ५५ गावे ११६ वाड्या मिळून १७१ गावांमध्ये पाणीटंचाईने सामान्यांची ससेहोलपट होणार आहे. टँकरव्दारे पाणीपुरवठ्यासाठी ५४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पेणच्या पाणीटंचाईवर उपाययोजना न केल्याने ही वास्तवता गंभीर रूप धारण करणार आहे.
यावर्षीचा मान्सून सरासरी ७० टक्केच झाला. त्यामुळे शिवारात पाण्याचा साठा झाला नाही. वापरावयाचे पाणी जानेवारीच्या प्रारंभीच संपल्याने जनतेला नळ पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. तलाव, शेततळी, नदीपात्र, नाले यांच्यावरील पाणीसाठा संपल्याने गावपाड्याचे हक्काचे वापरण्याचे पाणी आटले. लोकांना गावातून पेण शहरात स्थलांतर करावे लागले. दुसरीकडे हेटवणे व आंबेघर धरणात पाण्याचा मोठा साठा आहे. मात्र थेट वितरण व्यवस्था नसल्याने पाणी धरणातच पडून आहे. दरवर्षी पाणीटंचाई कृती आराखडा बनवून लाखो रुपयांचा टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर अनावश्यक खर्च करणारे शासन व रायगड जिल्हा परिषदेची ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दरवर्षी पाणीटंचाई परीक्षेत नापास होते. मुख्यमंत्र्यांनी हेटवणे धरणातून थेट पाणी खारेपाटातील गावांना देण्यासाठी एमएमआरडीएमधून ४० कोटी रुपयांची तरतूद के ली आहे. मात्र तो निधी उपलब्ध होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

पेण शहरात भरपूर पाणी मिळत असल्याने शासनाच्या टँकरपेक्षा विकतचे पाणी आॅटोरिक्षा, विक्रम-मिनीडोर तसेच टेम्पोद्वारे नागरिक १०० रुपये भाडे भरुन नेत आहेत. टँकरद्वारे ५४ लाखांची तरतूद केली असताना टँकरच उपलब्ध नसल्याने तो कृती आराखडा काय कामाचा? याकडे जिल्हाधिकारी व संबंधित पेणच्या पाणीयंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एप्रिलच्या प्रारंभीच पेण पंचायत समिती व पेण तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चे धडकू लागल्याने पेणची पाणीटंचाई यावर्षी शासकीय यंत्रणेला चांगलीच महागात पडणार आहे.

पेण पंचायत समितीमार्फत सध्या दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मात्र त्या टँकरची अवस्था आणि रस्त्याचे स्वरूप पाहाता प्रशासनाची चीड यावी, अशी अवस्था आहे. पाणीटंचाईची भीषण दाहकता असूनदेखील पंचायत समिती टँकर उपलब्ध करण्यासाठी हतबल आहे. दोन शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा कसा होणार. पेण तहसील प्रशासनाने ६ टँकर अधिग्रणासाठी पेण पंचायत समितीला प्रस्ताव सादर केलाय. मात्र खाजगी टँकर मालकांच्या देवाणघेवाणीवरून सारं घोडं अडलं आहे. आता ८ एप्रिलपासून चैत्र नवरात्रौत्सवास प्रारंभ होत आहे. नवमीनंतर प्रत्येक गावच्या ग्रामदेवतांच्या जत्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. ग्रामीण ग्रामदेवतांच्या जत्रा अक्षयतृतियेपर्यंत चालणार असून या प्रसंगी विकतचे पाणी आणावे लागणार आहे.

२९ मार्चला पेण तहसीलदार कार्यालयाकडून आदेश मिळाले आहेत. आम्ही बुधवारी सहा टँकर अधिग्रहणाची मागणी केली असून सहा ते सात दिवस टँकर उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागेल.
- जे. पी. म्हात्रे, टँकरव्दारे
पाणीपुरवठा विभाग, पं. समिती

Web Title: 171 water shortage in villages?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.