अलिबाग - रायगड लोकसभा मतदार संघातील दोन हजार 185 केंद्रामध्ये रविवारी (दि.7) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. 11 वाजेपर्यंत जिल्ह्यात 17.18 टक्के मतदान झाले होते. तरुणांसह ज्येष्ठ नागरिक, वेगवेगळ्या राजकिय पक्षातील प्रमुख मंडळींनी मतदानाचा हक्क बजावले. जिल्ह्यातील काही केंद्रावर गर्दी दिसून आली. मतदारांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. तर काही केंद्रावर फारशी गर्दी दिसली नसल्याने संमिश्र प्रतिसाद असल्याचे दिसून आले.
सकाळी सात ते अकरा या वेळेत जिल्ह्यामध्ये 17.18 टक्के मतदान झाले. अलिबाग विधानसभा मतदार संघात 18.06 टक्के, पेण विधानसभा मतदार संघात 14 टक्के, श्रीवर्धन मतदार संघात 12.35 टक्के, महाड मतदार संघात 12 टक्के व गुहागर मतदार संघात 25.05 टक्के व दापोली मतदार संघात 22.33 टक्के मतदान झाले. दोन तासाच्या कालावधीत गुहागर मतदार संघात सर्वात जास्त त्या खालोखाल दापोली, व अलिबाग मतदार संघात अधिक मतदान झाल्याचे आकडेवारी नुसार दिसून आले आहे.