अलिबाग : पूर्वी अलिबाग शहराची तहान भागवणारा वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावकडे दुर्लक्ष केल्याने तो गाळात रुतला होता. मार्च महिन्यात या तलावाचे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. आतापर्यंत तलावातून पावणे दोन क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे तलावाची खोली वाढून तलावात १७ लाख क्युबिक मीटर पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे.
तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने तलावाची साठवण क्षमता कमी होत केली. जलपर्णीचा विळखा तलावाला पडला. त्यामुळे ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाला अवकळा प्राप्त झाली होती. उन्हाळ्यात जेमतेम दोन ते तीन फूट पाणीसाठा तलावात शिल्लक राहात होता. दूषित जलस्रोतांमुळे या पाण्याचाही कुठल्याच प्रकारे वापर होत नव्हता. निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्व असलेल्या या तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही बाब लक्षात घेऊन तलावाचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला होता.
देशभरात २० हून अधिक तलावांचे पुनरुज्जीवन करण्याचा अनुभव पाठीशी असलेल्या आनंद मल्लीगवाड यांनी या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांचा अनुभव लक्षात घेऊन संस्था आणि कंपन्यांनी या कामासाठी आर्थिक मदत केली. मार्च महिन्यात तलावाच्या खोलीकरणाचे काम प्रत्यक्ष सुरू झाले. मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री लावून तलावातील गाळ काढला गेला. खोलीकरण करून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यात आली. हे काम अवघ्या नव्वद दिवसांत पूर्ण केले.
आता सुशोभीकरणावर भरया कामामुळे ऐतिहासिक गोकुळेश्वर तलावाला गतवैभव प्राप्त झाले आहे. तलावाची पाणी साठवण क्षमता कमालीची वाढली आहे. आता नैसर्गिक अधिवास जपत तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार असून या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली जाणार आहे. ज्यामुळे तलावाच्या परिसरात पक्षांचा अधिवास वाढवण्यासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. खोलीकरणातून निघालेला गाळ हा तलावाच्या भोवती बंदिस्तीसाठी वापरण्यात आला. तसेच हे काम करताना कुठेही सिमेंटचा वापर केला गेलेला नाही.पक्षी निरीक्षकांचे आवडते ठिकाण -गोकुळेश्वर तलाव हे गेली अनेक वर्षांपासून पक्षी निरीक्षकांचे आवडते ठिकाण बनले आहे. तलावाच्या परिसरात २१ प्रकारचे पक्षी आढळून येत असल्याची नोंद पक्षी निरीक्षकांनी केली आहे. तलावाच्या मधोमध पक्ष्यांसाठी मातीचे एक बेट तयार करण्यात आले. तलावाचे तीन विभाग करण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र भाग तयार करण्यात आला आहे.गोकुळेश्वर तलावाचे नैसर्गिक साैंदर्य कायम रहावे, येथील पशुपक्ष्यांचा अधिवास कायम राहावा हे विचारात घेऊन तलावाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. बंधाऱ्याच्या बांधकामासाठी सिमेंटचा वापर करण्यात आलेला नसून अशा प्रकारे सुशोभीकरण करण्यात येणारा महाराष्ट्रातील हा एकमेव तलाव आहे. आगामी काळात तलावाच्या बंधाऱ्यावर चालण्यासाठी पेव्हर ब्लाॅक बसविण्यात येणार आहेत. तसेच येथे ओपन जिम, नाना-नानी पार्क, बटरफ्लाय गार्डन अशी सुशोभीकरणाची कामे होणार आहेत.- गणेश गावडे, सरपंच, वेश्वी ग्रामपंचायत.