उरणमधील १७५ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:22 AM2019-01-02T00:22:57+5:302019-01-02T00:23:05+5:30
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ जानेवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उरण नगरपरिषदेचे १७५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
उरण : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ जानेवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उरण नगरपरिषदेचे १७५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. कामबंद आंदोलनामुळ उरण नगरपरिषदेचे कामकाज ठप्प झाल्याची माहिती कर्मचारी संघटनेचे मधुकर भोईर यांनी दिली.
प्रलंबित मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी २४ आॅगस्ट २०१७ रोजी राज्यातील संघटना संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये विविध मागण्यांसंदर्भात सर्व निर्णय ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे बैठकीत आश्वासन दिले होते; परंतु आज एक ते दीड वर्षाचा कालावधी पूर्ण होऊनही अद्यापही मागण्या प्रलंबितच आहेत. प्रलंबित प्रश्नासाठी सर्व संघटनेचे प्रतिनिधी शासनस्तरावर इतर विभागाच्या भेटी घेत आहेत. कर्मचाºयांकडून फक्त माहिती मागविण्याचेच काम सुरू आहे; पण कर्मचाºयांचे प्रश्न अजूनसुद्धा सुटलेले नाहीत. विविध समस्यांबाबत अद्यापही शासन आदेश निघालेले नाहीत, तसेच कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची माहिती कामगारनेते मधुकर भोईर यांनी दिली, त्यामुळे महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना या राज्यातील सर्वच कामगार संघटनांंनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्याआधी तीन दिवसांपासून कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला. मात्र, त्यानंतरही कामगारांच्या मागण्यांबाबतीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळे बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले. संपात सहभागी झालेल्या १७५ कर्मचाºयांनी उरण नगरपरिषद कार्यालयासमोर सकाळपासूनच जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. आंदोलनात हिंदू मजदूर सभेशी संलग्न असलेल्या संपूर्ण कोकणात कार्यरत असलेल्या म्युनिसिपल एम्प्लॉइज यूनियन आदी विविध कामगार संघटनाही संपात सहभागी होत असल्याची माहिती म्युनिसिपल एम्प्लॉइज यूनियनचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी दिली.