नेरळ : ग्रामपंचायत हद्दीत चौदा वित्त आयोगाच्या निधीतून ४० कचराकुंड्या उभारण्यासाठी तब्बल १८ लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. यात मोठा अपहार झाल्याची चर्चा नेरळ शहरात सुरू असून चुकीच्या पद्धतीने मूल्यांकन केले असताना ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता ठेकेदाराला १८ लाख रुपयांचे बिल अदा केले आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर आणि ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालाजी पुरी यांनी बुधवार, १७ जून रोजी नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील त्या कचराकुंड्यांची पाहणी केली.नेरळ ग्रामपंचायत हद्दीत १८ लाख रुपये खर्च करून ४० कचराकुंड्या उभारण्यात आल्या आहेत. तर काही जुन्याच कचराकुंड्यांची डागडुजी करून नव्याने बिल काढण्यात आले आहे. एका कचराकुंडीचे सुमारे ४५ हजार रुपये आशा ४० कुंड्यांचे १८ लाख रुपये बिल लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये कचराकुंड्या उभारण्यात मोठा अपहार झाल्याची चर्चा सुरू आहे. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नेरळकरांची होती. त्यानुसार पंचायत समितीकडून त्या कुंड्यांची पाहणी करण्यात आली. नेरळ शहरातील डम्पिंग ग्राउंडची सुधारण्या करण्याऐवजी कचराकुंड्या उभारण्यात १८ लाखांची उधळपट्टी केल्याने नेरळकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या ठिकाणी गरज नाही, त्या ठिकाणीसुद्धा कचराकुंड्या उभारण्यात आल्या आहेत. या कचराकुंड्या पाच बाय तीन फुटांच्या तर काही ठिकाणी कमी आकाराच्या आहेत. या कुंड्यांना लोखंडी दरवाजेदेखील लावण्यात आले नाहीत असे असताना अगोदरच ठेकेदाराला बिल अदा करण्याची घाई ग्रामपंचायतीने केली. गटविकास अधिकारी यांनी १७ जून रोजी कचराकुंड्यांची पाहणी करून पुन्हा इन्स्टिमेंट तयार करण्यास सांगितले.नेरळ ग्रामपंचायत हद्दीत ज्या ठिकाणी कचराकुंड्या बांधल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पंचायत समितीचे इंजिनीअर गुलाबराव देशमुख यांनी कचराकुंड्यांचे मूल्यांकन केले होते. आता पुन्हा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कर्जतचे प्रभारी अभियंता पी. एस. गोपणे यांच्याकडून मूल्यांकन मागविले आहे. आठवडाभरात मूल्यांकन देण्यास सांगितले आहे.- बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती कर्जत
कचराकुंड्यांवर १८ लाखांची उधळपट्टी: पुन्हा होणार मूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 11:24 PM