माणगावमध्ये कंपनीतील सिलिंडर स्फोटात १८ कामगार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:38 AM2019-11-16T06:38:31+5:302019-11-16T06:38:51+5:30
विळभागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा. लि. कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी चारच्या सुमारास झालेल्या बॉयलर सिलिंडर स्फोटात १८ कामगार जखमी झाले.
माणगाव : तालुक्यातील विळभागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा. लि. कंपनीत शुक्रवारी संध्याकाळी चारच्या सुमारास झालेल्या बॉयलर सिलिंडर स्फोटात १८ कामगार जखमी झाले. यातील पाच जण गंभीर भाजले असून, सर्व जखमींना मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यातील काही जखमींना डोळे गमवावे लागल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.
विळभागाड येथे पॉस्को कंपनीजवळ क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा.लि. कंपनी आहे. प्लॉट १५८ मध्ये झालेला हा स्फोट एवढा भयानक होता की, कामगारांच्या अंगावरील कपड्यांच्या चिंध्या झाल्या. कानठळ्या बसणाऱ्या आवाजामुळे नागरिक भयभीत झाले होते. काही क्षण काय झाले आहे हेच कोणाला कळले नाही. स्फोटामुळे कंपनीच्या छतावरील पत्रे तुटून उडाले. कं पनीतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. जो तो जिकडे वाट मिळेल तिकडे पळत होता.
चाचणी घेताना दरवाजावर आगीचा दाब येणार म्हणून कामगारांना दरवाजा बंद करून तो धरण्यास सांगण्यात आले होते. मात्र हा दाब इतका होता की, दरवाजा तुटून हे कामगार होरपळले. सुरक्षेची काळजी न घेतल्याने हा अपघात घडल्याचे घटनेप्रसंगी उपस्थित असलेले कर्मचारी ओम्कार म्हामुणकर यांनी सांगितले.
यातील जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून प्रकृ ती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पॉस्को कंपनी व्यवस्थापन आणि सरकारी रुग्णवाहिके च्या मदतीने मुंबईत नेण्यात आले. आशिष येरुणकर (रा. म्हसेवाडी), सुनील रेणोसे (३६, रा. भागाड), शुभम जाधव (२३, रा. महागाव, सुधागड), सूरज उमटे (२३, रा. भाले, माणगाव), किशोर कारगे (३०, रा. शिरवली, माणगाव), चेतन करकरे (२६, रा. माणगाव), राकेश हळदे (३०), कैलास पडावे (३२, रा. शिरवली, माणगाव) रुपेश मानकर (२५, रा. बोंडशेत, माणगाव), सुरेश मांडे (२४, रा. नांदगाव, पाली), प्रसाद नेमाणे (२३, रा. कुंडली, रोहा), वैभव पवार (२६, रा. शिरवली, माणगाव) राजेश जाधव (२८, रा. खाळजे, माणगाव), आकाश रक्ते (२०, रा. भागाड, माणगाव), मयूर ताह्मणकर (२४, रा. विळे, माणगाव), रजत जाधव (२२, कुंडली, रोहा), प्रमोद म्हस्के (२३, रा. मुगवली, माणगाव), सुनील पाटील (२५, रा. माणगाव) अशी स्फोटात भाजून जखमी झालेल्यांची नावे आहेत.
चाचणी घेताना दुर्घटना
कंपनीत आॅक्सिजन सिलिंडर बनविताना नवीन गॅसची चाचणी घेताना ही दुर्घटना घडली. एका रूममध्ये आग लावून ती विझविण्याची चाचणी सुरू होती. ज्या रूममध्ये ही आग लावली त्या रूमच्या तापमानापेक्षा आम्ही चाचणी करीत असलेल्या गॅसचे तापमान वाढले आणि छोट्या रूममध्ये गॅस जास्त झाला. हा जास्त झालेला गॅस आगीच्या स्वरूपात त्या रूमच्या दरवाजावाटे बाहेर आला आणि १० ते १५ सेकंदांत या दरवाजाजवळच असणारे सर्व कामगार होरपळले. काही सेकंदांतच हे घडल्याने कोणाला काही करता आले नाही. मी दरवाजापासून लांब असल्याने मला काही झाले नाही.
- कुंदन पंदीरकर, प्रत्यक्षदर्शी