सुधागडातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळांना टाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:11 AM2019-11-27T02:11:33+5:302019-11-27T02:12:02+5:30
सुधागडातील जिल्हा परिषदच्या एकूण १५४ शाळांपैकी २०१६ ते २०१८ पर्यंत १८ शाळांना टाळे लागले आहेत. ग्रामीण भागात पोट भरण्याचे साधन नसल्याने पालक स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.
पाली : सुधागडातील जिल्हा परिषदच्या एकूण १५४ शाळांपैकी २०१६ ते २०१८ पर्यंत १८ शाळांना टाळे लागले आहेत. ग्रामीण भागात पोट भरण्याचे साधन नसल्याने पालक स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.
बंद असलेल्या शाळांमध्ये तोरंकेवाडी, मढाळी, कासारवाडी, कळंबोशी, कळंब धनगरवाडी, खेमवाडी, केवणी धनगरवाडा, बलाप, रासळवाडी, कोंडगाव, गोंडाळे, हरनेरी, विडसई, मुळशी, वेळकरपाडा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नेणवली यांचा समावेश आहे. यातील ९ ते १० शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत.
तालुक्यात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा असल्याने पालकांची मानसिकता मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने खासगी शाळेत पाठवले जात आहे. त्याचबरोबर शिक्षकांची मुले खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याने खेड्यातील पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तसेच आदिवासीचे स्थलांतर होणे थांबले नाही व खेड्यापाड्यातील नागरिकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे खेड्यातून शहराकडे जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गावातील शाळेत शासनाच्या नियमानुसार पटसंख्या कमी असल्याने या १८ शाळांना टाळे लागले आहे. डोंगराळ भागात असणाऱ्या शाळा बंद झाल्याने मुलांना शिक्षणाविना राहावे लागत आहे.
शासन शिक्षणावर विविध योजना आखत असले तरी आजवर ग्रामीण भागातील गावांमध्ये खेडोपाड्यात शिक्षण व्यवस्था बिकट झाली असल्याचे पहावयास मिळत आहे. शिक्षण व्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासन खर्च करत आहे; परंतु खासगीकरणामुळे आदिवासी गोरगरीब पालकांना आपल्या मुलांना शाळा बंद झाल्याने सुविधा नसल्याने नाइलाज म्हणून खासगी शाळेत पाठवावे लागत आहे. तेथील शाळेत भरमसाठ आकारलेली फी भरावी लागत आहे. मग शासन निधी आमच्या काय कामाचा, असा प्रश्न पालकांना सतावत आहे.
शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदच्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या २० असली पाहिजे, त्यापेक्षा कमी असल्यास शाळा बंद करण्याचे आदेश आहेत, यामुळे पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद झाल्या आहेत.
- शिल्पा पवार, गटशिक्षण अधिकारी, सुधागड-पाली
सर्व शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी शिकावे, याकरिता शासनाने अनेक सोयीसुविधा दिल्या असून या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात जिल्हा परिषद शाळा अपयशी ठरल्याने खासगी शाळेचे फावले आहे. यात बदल घडल्यास जिल्हा परिषद शाळेचा पट वाढू शकतो.
- प्रमोद उतेकर, पालक
सुशिक्षितांना रोजगार मिळाल्यास व आदिवासींचे स्थलांतर थांबल्यास खेडोपाड्यातील शाळांची पटसंख्या वाढू शकते. त्याचबरोबर वेळापत्रकाशिवाय विद्यार्थ्यांच्या विविध गुणांकडे लक्ष दिल्यास खासगी शाळेमध्ये प्रवेश घेण्याची संख्या कमी होऊ शकते.
- आरती भातखंडे, ग्रामस्थ, पाली