मतमोजणीसाठी १८०० अधिकारी-कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:24 PM2019-05-20T23:24:36+5:302019-05-20T23:24:47+5:30
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची माहिती : रायगड लोकसभा मतदारसंघात होणार १५६ फे ºया; पोलीस यंत्रणा सज्ज
- जयंत धुळप
अलिबाग : रायगड लोकसभा मतदार संघात २३ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी अलिबाग जवळच्या नेहुली येथील रायगड जिल्हा क्र ीडा संकुलातील संपूर्ण वातानुकूलित सभागृहात गुरुवारी २३ मे रोजी होणार आहे. ही मतमोजणी पूर्णपणे शांततेत व कोणत्याही अनुचित प्रकाराविना होण्याकरिता मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिघात मतदान केंद्र हद्दीची घोषणा करण्यात आली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, राज्य राखीव पोलीस दल आणि रायगड जिल्हा पोलीस अशी त्रिस्तरीय कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येत असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी तथा रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
पोलीस व इतर सुरक्षा दलाचे जवान यासह एकूण १८०० मतमोजणी अधिकारी व कर्मचाऱ्यांची मतमोजणी संदर्भातील दोन प्रशिक्षणे पूर्ण झाली आहेत. मतमोजणीची रंगीत तालीम बुधवारी २२ मे रोजी मतमोजणी केंद्रात होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आणखी दोन निरीक्षक मतमोजणीच्या ठिकाणी असतील. निवडणूक निकाल फेरीनिहाय सर्वसामान्य जनतेला कळावा म्हणून उद्घोषणेची व्यवस्था करण्यात आली असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १६ लाख ५१ हजार ५६० मतदारांपैकी ६१.७७ टक्के म्हणजे १० लाख २० हजार १४० मतदारांनी मतदान केले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल्सचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या एकूण १५६ फेºया होणार आहेत. सर्वाधिक २८ मतमोजणी फेºया महाड विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी २३ मतमोजणी फेºया गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या होणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.
२३ मे रोजी मतमोजणी सकाळी ठीक आठ वाजता सुरू केली जाणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबलनिहाय आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सर्व विधानसभा मतदारसंघातील ८४ टेबलनिहाय पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसºया फेरीची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. सर्वप्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जातील, त्यानंतर पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकूण १४०५ मतदार व पोस्टल बॅलेटचे ९३९९ असे एकूण १० हजार ८०४ मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत अनुक्र मे ७५५ व ४८०५ अशी एकूण ५५६० मते प्राप्त झाली आहेत. सर्वप्रथम या मतांची मतमोजणी केली जाणार आहे.
टप्प्यातील सुरक्षा कवचात ईव्हीएम मशिन्सची वाहतूक
च्सुरक्षा कक्षातून विधानसभानिहाय मतमोजणी कक्षातील १ ते १४ टेबलवर ईव्हीएम वाहतुकीसाठी तीन टप्प्यात पाठविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
पहिला टप्पा : स्ट्राँग रु म ते प्रवेशद्वार
दुसरा टप्पा : स्ट्राँग रु म बाह्य प्रवेशद्वार ते मतमोजणी केंद्र प्रवेशद्वार
तिसरा टप्पा : मतमोजणी केंद्र प्रवेशद्वार ते मतदारसंघनिहाय १ ते १४ टेबलपर्यंत विनाव्यत्यय अखंडपणे वाहतुकीचे कडक बंदोबस्तासह नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सीसीटीव्हीचे जाळे
सुरक्षा कक्षाची सुरक्षितता व बंदोबस्त तपासण्याकरिता स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सूर्यवंशी दररोज सकाळी व संध्याकाळी भेट देत आहेत.
उपजिल्हाधिकारी ते तहसीलदार दर्जाच्या अधिकाºयांना सुध्दा रात्रंदिवस आठ तासांची ड्युटी नेमून दिलेली आहे. प्रवेश करणाºया व सुरक्षा कक्षाची पाहणी करणाºया प्रत्येक अधिकाºयाचे चित्रीकरण स्वतंत्र कॅमेराद्वारे करण्यात येते.
मतमोजणी केंद्र परिसरात ९० सीसीटीव्हीचे जाळे असून सुरक्षा रक्षकांचे टेहळणी मनोरे देखील तैनात आहेत. त्यावरून जवान २४ तास अतिशय बारकाईने नजर ठेवून आहेत.
मतमोजणीच्या दिवशी अधिकृत प्राधिकार पत्र किंवा निवडणूक आयोग ओळखपत्र असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, पर्यवेक्षक, मतमोजणी कर्मचारी या सर्वांना आयोगाच्या तसेच जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करावयाचे असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.