१८१ कुपोषित बालकांची तपासणी
By admin | Published: September 30, 2016 04:01 AM2016-09-30T04:01:08+5:302016-09-30T04:01:08+5:30
कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषद काम करीत आहे. राज्य सरकारच्या निधीमधून आरोग्य विभागाकडून दर सहा महिन्यांनी राबविली जाणारी बाल विकास केंद्र ही योजना
नेरळ : कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषद काम करीत आहे. राज्य सरकारच्या निधीमधून आरोग्य विभागाकडून दर सहा महिन्यांनी राबविली जाणारी बाल विकास केंद्र ही योजना सध्या निधीअभावी बंद आहे. राज्य सरकारने बंद केलेली योजना जिल्हा परिषदेमार्फत सुरू करण्यासाठी खर्च केला जाईल, असे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती प्रिया मुकादम यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीकडे १० टक्के महिला बालकल्याणचा निधी असतो, तो निधी अन्य कोणत्याही कामासाठी खर्च न करता ग्रामपंचायत हद्दीमधील कुपोषित बालकांना अतिरिक्त आहार देण्यासाठी खर्च करण्याच्या सूचना केल्याची माहिती त्यांनी दिली. कर्जत तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी महिला बालविकास विभाग आणि पनवेल येथील एमजीएम रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्र मांत सभापती सुवर्णा बांगरे, नेरळच्या सरपंच सुवर्णा नाईक, कोल्हारेचे उपसरपंच राजेंद्र विरले, तालुका प्रकल्प अधिकारी राजन सांबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, एमजीएमच्या डॉ. नकुल कोठारी उपस्थित होते. कुपोषित बालकांची पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात तपासणी करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
17,000 बालके कर्जत तालुक्यातील अंगणवाडीमध्ये येतात. त्यातील ४६ बालके अतिकुपोषित आणि १३५ तीव्र कुपोषित आहेत. तालुक्यात गेल्या महिन्यात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कारण जुलै २०१६ मध्ये अति आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या १५५ होती, ती तब्बल २६ ने वाढली आहे.