जयंत धुळप
अलिबाग : लोकसभा निवडणुका झाल्या, आश्वासनांच्या फैरी झडल्या; पण जनसामान्यांचे प्रश्न मात्र सुटले नाहीत वा ते प्रत्यक्ष सोडवण्याकरिता कोणताही राजकारणी वा कोणताही सरकारी कर्मचारी पुढे आला नाही. अखेर पेण तालुक्यातील तीव्र जलदुर्भिक्षाच्या खारेपाटातील वढाव गावांतील तब्बल १८१ महिला एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्या गावातील सहा एकराचा तलाव खोदून त्यातील गाळ काढण्याचे काम सामूहिक श्रमदानातून सुरू केले आहे.
वढाव गावात पिण्याचे पाणी तीन दिवसांतून एकदा आणि तेही केवळ एका तासासाठी येते. तेही गावातील सर्व भागातील नळाला येतेच असे नाही. परिणामी, पिण्याच्या पाण्याचे अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर वास्तव येथील महिला अनुभवत आहेत. गावातील धुणीभांडी या कामासाठी उपयुक्त पाण्याचा सहा एकरांचा तलाव यंदा डिसेंबर २०१८ मध्ये त्यातील पाणी उपसून वाळवण्यात आला. तलावाच्या भिंतींचे बांधकाम करण्यासाठी तलाव सुकवण्यात आल्याचे ग्रामपंचायतींच्या सूत्रांनी सांगितले. तलाव सुकवला; परंतु भिंती बांधण्याचे काम मात्र अद्याप सुरू झालेले नाही. वढाव गावकी या तलावाचे काम करणार होती, ते त्यांनी केले नसल्याने अखेर या सर्व महिलांनी हे काम करण्याचा हा निर्णय घेतला आहे.
गावातील तलाव सुकल्याने गावातील महिलांना घरातील धुणीभांडी करण्यासाठी शेजारच्या दिव गावातील तलावावर जावे लागते आहे. दिव गावातील तलावाच्या भिंतींचे दुरुस्ती काम गेल्या वर्षीपासून सुरू आहे. यावर्षीही ते काम होणार होते; परंतु वढाव गावातील महिलांना धुण्याभांड्यासाठी पाणी मिळावे, याकरिता दिवच्या सरपंचांनी यंदा भिंती बांधण्याचे काम थांबवून ठेवले आहे. त्याकरिता वढाव गावच्या महिला त्यांना धन्यवाद देत आहेत. दिव गावातील तलावाचे पाणी यंदा मिळाले नसते तर मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती.अत्यंत गंभीर पाणीसमस्येच्या पार्श्वभूमीवर वढाव गावातील गावदेवी ग्राम विकास संस्थेच्या सदस्य असणाऱ्या १८१ महिलांनी कंबर कसली आहे. वढावच्या तलावाचा गाळ काढण्याचे काम श्रमदानातून करण्याचा निर्णय घेतला. १५ महिला बचतगटांच्या १८१ महिलांनी एकत्र येऊन या गावदेवी ग्रामविकास संस्थेची स्थापना केल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा हेमलता म्हात्रे यांनी दिली. उन्हाळी पाणीटंचाईच्या काळात वढाव ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता पाण्यासाठीचा तातडीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविण्याचे आदेश ग्रामसेवक एस. बी. डुकरे यांना पेण पंचायत समितीच्या सभापतींनी दिले आहेत. मात्र, त्यावर तीन दिवस झाले; पण अद्याप प्रस्ताव पाठविलेला नसल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याचा टँकर येत नाही.
खोदाईसाठी दोन पोकलेन देण्याचे एका दानशूराचे आश्वासनमहिलांनी सामूहिक श्रमदान सुरू केल्यावर, तालुक्यातील काहींनी आर्थिक मदत देण्यास प्रारंभ केला. त्यातून आतापर्यंत २० हजार रुपये जमले आहेत. गावकीच्या पंचांशी संपर्क साधला असता, गावकीकडे १ लाख ७५ हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातून काही पैसे देण्याचा निर्णय पंचांनी सांगितला. त्याचबरोबर १८१ महिलांच्या श्रमदानास प्रारंभ झाल्यावर एका दानशूराने गाळ काढण्याकरिता दोन पोकलेन मशिन्स देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्याचा डिझेलचा खर्च करावा लागणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.रोजगार हमी योजनेतून श्रमदानाचे पैसे मिळाल्यास तलावाच्या भिंतीसाठी वापरणार
गावदेवी ग्रामविकास संस्थेच्या सदस्य असलेल्या १८१ महिलांपैकी २० महिलांची रोजगार हमी योजने अंतर्गत जॉब कार्ड आहेत. उवर्रित महिला सदस्याची जॉब कार्ड ग्रामपंचायतीत पडून आहेत. आमची जॉबकार्ड करून मिळाली तर आम्हाला आमच्या श्रमदानाचे पैसे सरकारकडून मिळतील. ते पैसे आम्हीला तलावाच्या भिंतींचे बांधकाम करण्यासाठी वापरता येतील. मात्र, ही जॉबकार्ड तातडीने करून मिळणे गरजेचे असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. यंदाच्या पावसाआधी तलावाचे काम पूर्ण केले तरच पुढच्या उन्हाळ्यासाठी पाण्याची तजविज होणार असल्याने आमची घाई असल्याचे त्यांनी सांगितले.
तलावाच्या कामासाठी दागिने गहाण ठेवण्याची तयारीगावच्या पाण्याची समस्या सोडवण्याकरिता आपणच श्रमदान करून तलावातील गाळ काढावा, असा निर्णय सर्व महिलांच्या बैठकीत घेण्यात आला.
गाळ काढण्याच्या कामास तळपत्या उन्हात प्रत्यक्ष प्रारंभही केला. दरम्यान, या सर्व कामासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च येणार आहे.हे ३० लाख रुपये उभे कसे कराचे, असा प्रश्न होता. त्याकरिता सर्व महिलांची बैठक घेतली असता, गरज भासली तर अंगावरील सर्व सोन्याचे दागिने गहाण ठेवून पैसे उभे करू; पण तलावाचे काम पावसाळ्याच्या आधी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा निर्णय १८१ महिलांनी सामूहिकरीत्या घेतल्याचे हेमलता म्हात्रे यांनी सांगितले.