सहा महिन्यांत १८३ बालके कुपोषणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 12:44 AM2021-03-12T00:44:02+5:302021-03-12T00:44:39+5:30
रायगड जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नांना यश; आहाराची घेतली काळजी
लाेकमत न्यूज नेटवर्क
रायगड : कोरोना विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर ताळेबंदी तसेच अनेक निर्बंध असतानाही कुपोषित बालकांच्या आरोग्य व आहाराची काळजी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने लिलया पेलली. दत्तक पालन योजनेच्या माध्यमातून कुपोषित बालकांना घरपोच आहार पोहोचवल्यामुळे जुलै २०२० ते जानेवारी २०२१ या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील १८३ बालके कुपोषणमुक्त झाली आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलले जात आहे .
रायगड जिल्ह्यात ८ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यातच २४ मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे अनेक निर्बंधांचा सामना प्रशासनासह नागरिकांना करावा लागला. परिणामी, एप्रिल आणि मे हे दोन महिने कुपोषित बालकांचे सर्वेक्षण झाले नव्हते. मार्चनंतर जून महिन्यापासून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. जुलै महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात तीव्र कुपोषित ७६ तर सौम्य कुपोषित ५७६ अशी ६५२ कुपोषित बालके आढळून आली. मात्र, लॉकडाऊनमध्ये सर्व यंत्रणा ठप्प झाली अनेक निर्बंध आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती गीता जाधव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तक पालन योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी मुलांना आहार दिला. कुपोषित मुलांच्या घरामध्येच बालविकास केंद्र सुरू केले. त्याचबरोबर गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून आहार कसा असावा आणि कसा द्यावा, याबाबतचे मार्गदर्शन करून आहार घरापर्यंत पोहोचविण्यात आला.
जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे कुपोषण आटोक्यात आले. जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात तीव्र कुपोषित ५९ तर सौम्य कुपोषित ४१० अशी एकूण ४६९ बालके कुपोषित आढळून आली असून, सहा महिन्यात कुपोषित बालकांच्या संख्येत १८३ ने घट झाली असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली.
कुपोषित बालक कसे ठरविले जाते?
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दर महिन्याला बालकांचे वजन आणि उंची मोजली जाते. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने वयानुसार बालकांचे किमान वजन व उंची किती असली पाहिजे याचे निकष निश्चित केले आहेत. या निकषाच्या आत वजन आणि उंची भरल्यास, संबंधित बालक हे कुपोषित समजले जाते.
कुपोषित बालके आकडेवारी
तालुका जुलै जानेवारी घट/वाढ
अलिबाग ४१ ३४ -७
कर्जत १२४ ९४ -३०
खालापूर ४० ३२ -८
महाड ७५ ५२ -२३
माणगाव ७२ ६४ -८
तळा २५ १५ -१०
म्हसळा २३ २७ ४
मुरुड २४ १९ -५
पनवेल ३९ ५२ १३
पेण ५ ३ -२
रोहा ५२ २५ -२७
पोलादपूर २९ १९ -१०
श्रीवर्धन २४ १५ -९
सुधागड ६२ ३ -५९
उरण १७ १५ -२
एकूण ६५२ ४६९ -१८३