लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शेतीची कामे जोरात सुरू असताना सर्पदंशाचेही प्रमाण वाढले आहे. सर्पदंशावर उपचारासाठी सरकारी दवाखान्यात औषधांसह सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात वर्षभरात १८३ सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. यातील ५ जणांना उपचार सुरू असताना, आपला जीव गमवावा लागला आहे. सर्पाने दंश केलेल्या रुग्णांना जीवदान देण्याचा प्रयत्न येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे.साप चावल्यानंतर पहिल्या दोन तासांत प्रथमोपचाराबरोबरच तत्काळ वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते, अन्यथा कोब्रा, फुरसा यांसारख्या सर्पाने दंश केल्यास रुग्ण दगावण्याची जास्त शक्यता असते. सरकारी दवाखान्यात वेळेत रुग्ण आणूनही कधी डॉक्टर नाहीत, तर कधी व्हेंटिलेटर ऑपरेटर, तर कधी पुरेशी औषधे नाहीत, या कारणास्त नागरिकांना नाइलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. विंचू दंशावर लस शोधून काढणारे महाड येथील डॉ.हिंमतराव बाविस्कर यांच्या मते सर्पदंशावर वेळेत उपचार न मिळाल्यास किडण्या फेल होणे, यांसारखे आजार होतात.
साप चावताच काय काळजी घ्यावी जखम स्वच्छ पाण्याने धुवा.सर्पदंश झालेल्या व्यक्तीला धीर द्यावा. पायी चालणे, जास्त बोलणे टाळावे. सर्पदंश झालेला भाग असेल, तर दंडाला दोरीने बांधून आवळून घ्यावे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चहा, कॉफी किंवा दारू पाजू नये. दंश झालेल्या जागेवर चिरा किंवा काप घेऊ नये. डॉक्टरांना कल्पना द्यावी, जेणेकरून त्यांना तत्काळ मदत करता येईल.
गैरसमजुती आणि घ्यावयाची काळजी सापाचे विष मंत्राने उतरत नाही, सर्पदंशावर प्रतिसर्प (स्नेक अँटिव्हेनिन) विष हे एकमेव औषध आहे. व्यक्तीला कडुनिंबाचा पाला, मिरची खायला देऊ नका, कोणतीही औषधी वनस्पती उगाळून लावू नका, धोतऱ्याच्या बिया वगैरे खाण्यास देऊ नका, गरम लोखंड लावणे (डागण्या देणे) चुकीचे आहे, दंश केलेला साप मारून अथवा जिवंत डॉक्टरांकडे नेऊन दाखवू नका, सर्प दंश होताना तो उलटला, तरच विषबाधा होते हे चुकीचे आहे, व्यक्तीने एकट्याने दवाखान्यात न जाता सोबत सहकारी घेऊनच जावे.