साइडपट्टी खोदल्याने १९ लाखांचा दंड; बांधकाम विभागाचा ठेकेदाराला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 03:29 AM2018-02-11T03:29:33+5:302018-02-11T03:29:42+5:30
मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून महाड, रायगड मार्गाच्या साइडपट्टीवर खोदकाम केल्याप्रकरणी कंपनीच्या ठेकेदाराला १९ लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविली आहे.
महाड : मोबाईल कंपनीची केबल टाकण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीच्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन करून महाड, रायगड मार्गाच्या साइडपट्टीवर खोदकाम केल्याप्रकरणी कंपनीच्या ठेकेदाराला १९ लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस महाड सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविली आहे.
रिलायन्स जिओ कंपनीच्या केबल टाकण्याचे काम करण्यासाठी कंपनीच्या ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रीतसर परवानगी घेतली आहे. त्यासाठी १९ लाख रुपयांचा भरणादेखील केला आहे. मात्र, प्रत्यक्षात चर खणण्याचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांचे आणि अर्टी व शर्तींचे पालन ठेकेदाराने केलेले नाही. ज्या पद्धतीने चर खोदण्याचे काम सुरू आहे, त्यामुळे साइडपट्टी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला त्वरित हरकत घेत हे काम बंद करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. त्याचबरोबर १९ लाख रुपये दंड भरण्याची नोटीसदेखील बजावल्याची माहिती विभागाचे शाखा अभियंता बोर्ले यांनी दिली.
महाड-रायगड मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. लवकरच हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाल्यानंतर, रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम करू नये, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्षभरापूर्वीच देण्यात आल्या आहेत, असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठेकेदाराला चर खोदण्याची परवानगी कशी दिली, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
प्रस्तावित महामार्ग हा काँक्रीटचा आणि दुपदरी असून, जिथे साइडपट्टी आहे तो भाग रस्त्याच्या खाली जाणार आहे. त्यामुळेही हे काम वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे.