जिल्ह्यात १९ अनधिकृत शाळा
By admin | Published: June 16, 2017 02:14 AM2017-06-16T02:14:46+5:302017-06-16T02:14:46+5:30
रायगड जिल्ह्यात १९ ठिकाणी शासनाच्या परवानगीशिवाय अनधिकृत शाळा सुरू आहेत. अशा अनधिकृत शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये शासनाची परवानगी
- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यात १९ ठिकाणी शासनाच्या परवानगीशिवाय अनधिकृत शाळा सुरू आहेत. अशा अनधिकृत शाळांनी शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये शासनाची परवानगी प्राप्त केल्याशिवाय संबंधित संस्थांनी शाळा सुरू करू नयेत. अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण हक्क कायदा -२००९ अन्वये व याबाबतच्या महाराष्ट्र शासन नियमावली २०११ नुसार उचित कार्यवाही करावी. पालकांनी पाल्यांस अशा शाळांना मान्यता नसल्यामुळे प्राथमिक शाळेत प्रवेश देवू नये, असे आवाहन रायगड जि.प. प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी एका सरकारी पत्राद्वारे केले आहे.
अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यता प्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास पालकच जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची घोषणा शाळा प्रारंभाच्या आदल्याच दिवशी करण्यात येते. त्यातून पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होतो. अशा किती आणि कोणत्या अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने काय कारवाई केली, याबाबतची माहिती आजवर कधीही प्रकाशित करण्यात आलेली नाही.
अनधिकृत म्हणून घोषित केलेल्या शाळा पुढील शैक्षणिक वर्षात रीतसर सुरू असल्याचे सर्वत्र दिसून येते. मग शिक्षण विभाग दरवर्षी हा संभ्रम का निर्माण करते असा प्रश्न उपस्थित करुन, रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत शाळांवर आजवर काय कारवाई केली याचा अहवाल पत्रकारांच्या माध्यमातून प्रसिध्द करावा अशी मागणी सामाजिक तथा शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे.
अनधिकृत १९ शाळांपैकी पनवेल तालुक्यातील ११ शाळा
जिल्ह्यातील या १९ घोषित अनधिकृत शाळांपैकी ११ शाळा एकट्या पनवेल तालुक्यात आहेत. यामध्ये प्लेजंट इंग्लिश स्कूल नेरेपाडा (पनवेल), एस.ई.ए. अँड वुई ट्रस्ट मा आशा हिंदी स्कूल सुकापूर (पनवेल), बालाजी कान्हा पाटील हायस्कूल मोहा (पनवेल), प्लेजंट इंग्लिश मिडियम स्कूल अँड प्रायमरी सांगाडे (पनवेल), न्यू इंग्लिश मिडियम स्कूल चिंचपाडा (पनवेल), चांगुणाबाई ज्ञानदेव ठाकूर एज्युकेशन सोसा.प्रायमरी स्कूल उलवा (पनवेल), पराशक्ती इंग्लिश मिडियम स्कूल आपटा (पनवेल), होली स्पीरीट इंग्लिश मिडियम स्कूल आपटा (पनवेल), श्री सुविधा विद्यालय कामोठे (पनवेल), ह.भ.प.श्री. दामजी गणपत गोवारी विद्यालय कामोठे (पनवेल), रायझिंग सन प्री प्रायमरी स्कूल कामोठे (पनवेल) आणि वेदांत पब्लिक स्कूल पनवेल आपटा (पनवेल) या शाळांचा समावेश आहे. उर्वरित अनधिकृत घोषित शाळांमध्ये रायगड एज्युकेशन सोसा.प्राथ.शाळा चणेरा (रोहा), सेन्स प्रायमरी स्कूल जासई (उरण), रु ता गावंड संस्थेचे लिटिल वंडस स्कूल परळी (सुधागड)., डॉ.ए.आर.उंड्रे इंग्लिश स्कूल रानवली (श्रीवर्धन), डॉ.ए.आर.उंड्रे इंग्लिश स्कूल वाळवटी (श्रीवर्धन), श्री लक्ष्मीनारायण प्राथमिक विद्यामंदिर (अलिबाग), कै.सीताराम शिवराम कदम मराठी मिडियम स्कूल बिरवाडी (महाड) आणि फलाई इंग्लिश मिडियम स्कूल (माणगांव) या शाळांचा समावेश आहे.