फणसाड अभयारण्यात केलेल्या पाहणीत पक्ष्यांच्या १९० प्रजातींची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 12:33 AM2021-02-07T00:33:27+5:302021-02-07T00:33:37+5:30

महाराष्ट्र वन विभाग आणि ग्रीन वर्क ट्रस्टच्या गणनेतून माहिती

190 species of birds recorded in Fansad Sanctuary | फणसाड अभयारण्यात केलेल्या पाहणीत पक्ष्यांच्या १९० प्रजातींची नोंद

फणसाड अभयारण्यात केलेल्या पाहणीत पक्ष्यांच्या १९० प्रजातींची नोंद

Next

- संजय करडे

मुरुड जंजिरा : तालुक्यातील फणसाड अभयारण्यात प्राण्यांप्रमाणेच पक्ष्यांची संख्या वाढल्याने याची नोंद शासन पातळीवर घेण्यात आली आहे. नुकत्याच केलेल्या पाहणीत १९० पक्ष्यांच्या जाती आढळल्या आहेत.

सुमारे ५४ किलोमीटर चौरस परिक्षेत्रात हे अभयारण्य विस्तारलेले असून, येथे निलगिरीसारखी उंच झाडे व मोठी वनसंपदा असलेले हे अभयारण्य आहे. इ. स. १९८६ मध्ये अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आलेले मुरुडमधील फणसाड अभयारण्य ५४ चौ. कि. मी. क्षेत्रफळात वसलेले आहे. मुरुडच्या नबाबाचे हे शिकारीसाठीचे राखीव जंगल असल्याने अन्य मानवी हस्तक्षेपापासून ते आजही सुरक्षित राहिले आहे. महाराष्ट्र वन विभाग आणि ग्रीन वर्क ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने फणसाड अभयारण्यामध्ये नुकतेच तीन दिवसीय पक्षी निरीक्षण व गणनेचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक दुर्मीळ प्रजातींसह १९० प्रजातींची नोंद करण्यात आली. यामध्ये काही पक्ष्यांची प्रथमच नोंद करण्यात आली आहे. लाइन ट्रान्सेक्ट आणि पॉइंट काउन्ट या शास्त्रीय पद्धतीने ही पक्षी गणना पार पडली. यासाठी देशभरातील १३० लोकांनी नोंदणी केली होती. मात्र, त्यातून ४१ लोकांची निवड करून त्यांचे ११ गटांमध्ये विभाजन करण्यात आले. प्रत्येक गटासोबत एक पक्षीतज्ज्ञ, ग्रीन वर्क्स ट्रस्टचा स्वयंसेवक व एका वनरक्षकाचा समावेश होता. या उपक्रमामध्ये कोणत्याही पक्ष्याच्या ध्वनिमुद्रित आवाजाचे प्रक्षेपण करण्यात आले नाही, गणनेदरम्यान झालेल्या पक्ष्यांच्या नोंदणीची पडताळणी तज्ज्ञ व्यक्तींकडून केल्यानंतरच त्यास मंजुरी देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता वन्यजीव विभाग ठाणे येथील उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, सहायक वनरक्षक कुपते, वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले व ग्रीन वर्क्स ट्रस्टचे निखिल भोपळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. अशा प्रकारच्या पक्षी गणनेचा कार्यक्रम वर्षातील तीन हंगामांत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

यांची झाली नोंद
अभयारण्यातील ५४ चौ.कि.मी. क्षेत्रात माशीमार खाटीक, बेडूक मुखी, कोतवाल, कोकीळ, टिकेलचा कस्तुर, विविध प्रजातींचे घुबड, निळ्या चष्म्याच्या मुंगश्या, मलबारी कवड्या, धनेश, रंगीत तुतारी, कालवफोड्या, तिर चिमणी, कस्तुर इत्यादी दुर्मीळ प्रजातींची नोंद करण्यात आली. पक्ष्यांच्या व्यतिरिक्त ५० प्रजातींची फुलपाखरे, १८ प्रजातींचे सरपटणारे प्राणी, १० प्रजाती उभयचर, ४ प्रजातीचे कोळी, २३ प्रजातींचे सस्तन प्राणी यांची नोंद करण्यात आली.

वन्यजीव गणना बुद्ध पौर्णिमेला होते. तेव्हा ही गणना फक्त रात्रीच पाणवठे असलेल्या ठिकाणाहून उपलब्ध आकडेवारीतून मिळत असे; परंतु यावेळी आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला. यासाठी तज्ज्ञांची निवड करण्यात आली होती. फणसाड अभयारण्यात कोणकोणते पक्षी आहेत, याची माहिती सर्वांना होण्यासाठी हा उपक्रम केला. पक्षी गणनेसाठी वापरलेले निकष वन्यजीव गणनेसाठी वापरणार असून, पुढे औषधी वनस्पतींची गणना करणार आहे.
- राजवर्धन भोसले, वन परिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य

Web Title: 190 species of birds recorded in Fansad Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.