१,६९७ गाव-वाड्या टंचाईग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 11:29 PM2020-02-12T23:29:56+5:302020-02-12T23:30:02+5:30
दत्ता म्हात्रे। लोकमत न्यूज नेटवर्क पेण : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाल्याने पाणीटंचाईची आरोळी ठिकठिकाणी गावामध्ये ऐकू ...
दत्ता म्हात्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पेण : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाल्याने पाणीटंचाईची आरोळी ठिकठिकाणी गावामध्ये ऐकू येत आहे. गतवर्षी वरुणराजाने धुवाधार पर्जन्यवृष्टी केल्याने जिल्ह्यात सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा दुपटीने पाऊस पडला आहे. परिणामी, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्याने टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या ३३६ ने कमी झालेली आहे. गत तीन वर्षांत टंचाईग्रस्त गावांच्या उपाययोजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, यावर्षी पावसाने चांगली वृष्टी केल्याने संभाव्य टंचाईग्रस्त ४४६ गावे, १,२५१ वाड्या अशा एकू ण१,६९७ गाव-वाड्यांमध्ये उपाययोजनेसाठी व पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल नऊ कोटी ३९ लाखांच्या टंचाई आराखडामध्ये जिल्हा प्रशासनातर्फे खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. पेण तालुक्यासाठी ५९ गावे २१४ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी एक कोटी १२ लाख ५१ हजारांचा टंचाईकृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
नेहमीच येतो उन्हाळा आणि पाणी मिळवण्यासाठी दूरदूर पळा, असे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे विदारक चित्र आहे. पेणच्या खारेपाटात पाणीटंचाई दरवर्षी पाचवीला पूजलेली असते. महिलांना पाणी मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागते. पेणमध्ये शहापाडा, आंबेघर व हेटवणे मध्यम प्रकल्प अशी तीन धरणे असूनही ‘धरण उशाला, कोरड घशाला’ हे ब्रीदवाक्य गेले २० ते २५ वर्षे कायम राहिले आहे. टंचाईग्रस्त गावांना धरणातून पाणी वितरण करणारी सक्षम वितरण व्यवस्था नसल्याने एकदा का उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाईचा विषय एरणीवर येतो. महिलांचे हंडा मोर्चे, ठिय्या आंदोलने व अधिकाऱ्यांना घेराव, या घटना घडत राहतात. मात्र, तात्पुरत्या उपाययोजना करून हा प्रश्न कधीच मार्गी लागणार नाही. पेण ग्रामीण परिसरात पाणीटंचाईचे भीषण वास्तव आजही कायम आहे. फेब्रुवारी ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणीटंचाईची समस्या आ वासून उभी राहते. मात्र, पाऊस पडला की पुन्हा साऱ्यांनाच टंचाईचा विसर पडतो. जिल्हा प्रशासनाला या वर्षी मात्र टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी झाल्याने थोडी उसंत घेता येणार आहे.
तीन वर्षांत पाणीटंचाई निवारनार्थ के लेला खर्च: मागील तीन वर्षांत पाणीटंचाई निवारनार्थ २०१५-१६ वर्षात सात कोटी ८८ लाख, २०१६-१७ मध्ये सहा कोटी २५ लाख, २०१७-१८ मध्ये आठ कोटी ३३ लाख, २०१८-१९ मध्ये नऊ कोटी ४० लाख, अशा प्रकारे उपाययोजनांवर खर्च करण्यात आला होता. मात्र, हा खर्च करूनही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजनांअभावी केलेला खर्च पाण्यातच जात होता.
यावर्षी ३३६ टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी : या वर्षी मात्र ३३६ टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तीन कोटी ५३ लाख रुपये खर्चाची तरतूद केली आहे. नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीसाठी एक कोटी ४३ लाख नवीन विंधण विहीर बांधण्यासाठी तीन कोटी ५५ लाख तर विंधण विहीर दुरुस्तीसाठी ३६ लाख रुपयांची तरतूद के ली आहे.
पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू
च्पेणच्या खारेपाटाच्या टंचाईवर उपाययोजनेसाठी ३० कोटींच्या हेटवणे-शहापाडा ते खारेपाटातील २९ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठीच्या योजनेचे काम सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २८ फेब्रुवारी रोजी ही योजना कार्यान्वित करणार असल्याचे पेण प्रांताधिकारी कार्यालयातील बैठकीप्रसंगी सांगितले होते. मात्र, या योजनेच्या कामाची प्रगती पाहता जूनपर्यंत हे काम होईल, अशी शक्यता दिसत नाही.
च्महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना हे शिवधनुष्य पेलताना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे पेण पंचायत समिती प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईकृती आराखड्यात एक कोटी १२ लाख ५१ हजार रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामधून ५९ गावे २१४ वाड्या अशा मिळून २७३ गावे व वाड्यांचा टंचाईग्रस्त आराखड्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.