११ कोटींची पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे थकीत; पाच कोटी १२ लाखांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 02:43 AM2019-12-03T02:43:34+5:302019-12-03T02:43:41+5:30
रायगड जिल्हा परिषदेला पाणीपट्टीमार्फत दरवर्षी १४ कोटी सात लाख रुपयांचा निधी प्राप्त होतो.
- आविष्कार देसाई
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून आतापर्यंत फक्त पाच कोटी १२ लाख ४२ हजार रुपयांची पाणपट्टी वसूल करण्यात यश आले आहे. मात्र, अद्यापही तब्बल ११ कोटी ३७ लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल करणे बाकी आहे. ३१ मार्चअखेर सर्व पाणीपट्टी वसूल करण्याचे ग्रामपंचायत विभागापुढे मोठे आव्हान असल्याचे दिसून येते.
रायगड जिल्हा परिषदेला पाणीपट्टीमार्फत दरवर्षी १४ कोटी सात लाख रुपयांचा निधी प्राप्त होतो. २०१९-२० साठी १६ कोटी ५० लाख ७४ हजाराची वाढीव म्हणजेच सुमारे अडीज लाख रुपयांची मागणी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आणि नागरिकांच्या असहायतेमुळे पाणीपट्टी वसूल करण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरत असल्याचे सध्याचे चित्र आहे. योग्य पद्धतीने आणि वेळेमध्ये वसुली होत नसल्यानेच विविध ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी निधी देताना जिल्हा परिषदेला चांगलेच अडचणीचे ठरत आहे.
रायगड जिल्ह्यात ८०९ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांना पाणी, रस्ते, आरोग्य, वीज, ग्रामपंचायत हद्दीतील अन्य विकास कामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात. ग्रामपंचायती हद्दीत
राहणाºया नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला
जातो. त्यासाठी पाइप लाइनद्वारे सार्वजनिक ठिकाणी आणि घरोघरी पाणी दिले जाते. यामुळे ग्रामपंचायतीसाठी ठरावीक कर रूपाने नागरिकांकडून पाणीपट्टीमार्फत रक्कम आकारते.
रायगड जिल्हा परिषदेकडे आलेल्या पाणीपट्टीतून त्या-त्या ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी निधी वर्ग केला जातो.
नागरिकांनी पाणीपट्टी भरली नसल्याने आणि ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामपंचायतींच्या विकासकामांना खीळ बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुर्लक्षामुळे थकबाकी
ग्रामपंचायतीने दिलेल्या पाण्याची पाणीपट्टी ही नागरिकांनी वेळेवर भरणे गरजेचे असते. मात्र काही नागरिक पाणीपट्टी ही वेळेवर भरत नसल्याने पाणीपट्टीची रक्कम थकीत राहते.
वास्तविक ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरण्यासाठी व्यवस्थापन करणे गरजेचे असते मात्र या ठिकाणी ग्रामपंयातींकडून दुर्लक्ष होत असल्याचे थकीत रकमेवरुन दिसून येते.
ग्रामपंचायतीने वसूल केलेली पाणीपट्टी रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे मार्च अखेरपर्यत जमा करायची असते.
परंतु जिल्ह्यातील ८०९ ग्रामपंचायतीमध्ये मार्च महिना उलटून गेला तरी अद्याप ११ कोटी ३७ लाख रुपयांची वसूली थकीत राहिली आहे. आॅक्टोबर महिन्यांपर्यंत सुमारे ३१ टक्के पाणीपट्टी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी भरली आहे.
पाणीपट्टीची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींकडून वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ३१ मार्च अखेरपर्यंत सर्व थकीत रकमेची वसुली करण्यात येणार आहे.
- शीतल पुंड, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत.