पेणमध्ये नोकरीचे आमिष दाखवून १२ तरुणांची फसवणूक; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:21 PM2019-09-13T23:21:02+5:302019-09-13T23:21:06+5:30
जेएसडब्ल्यूमध्ये भरती असल्याचे सांगून गंडा
पेण : वडखळ, डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीत नोकरीला लावतो असे सांगून १२ सुशिक्षित तरुणांची फसवणूक करणाऱ्या दुकलीला वडखळ पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे नोकरीसाठी पैसे मागणाऱ्यांना यापुढे सांभाळून व्यवहार करावे लागणार आहेत.
पेण डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीचे बनावट अकाऊंट तयार करून त्याव्दारे बेरोजगार तरुणांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. त्यांच्याकडून अर्ज मागवून, कंपनीच्या नावाने प्रश्नपत्रिका तयार करून वडखळ येथील एका हॉटेलमध्ये सोडवत असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी आत्माराम बेतकेकर व प्रवीण म्हात्रे यांना मिळाली होती. याबाबतची माहिती त्यांनी वडखळ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांना दिली. त्यानुसार कंपनीच्या प्रवेशव्दाराशेजारील हॉटेलमध्ये धाड टाकली असता यतीश म्हात्रे बेरोजगार तरुणांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेत असताना रंगेहाथ पकडले. यतीश याचा साथीदार चंदन कंधारी याला देखील अटक करण्यात आली. चंदन कंधारी हा कंपनीत इंजीनिअर म्हणून कामाला आहे. त्याने कंपनीचा खोटा ईमेलआयडी बनवून तो मेल कंपनीत भरती आहे असे सांगून बेरोजगार तरुणांना पाठविला. यानंतर यातील १२ तरुणांची निवड करुन त्यांच्याकडून कागदपत्रे व ३०ते ४० हजार रुपयांची मागणी केली.ही मागणी पूर्ण झाल्यावर जेएसडब्लू कंपनीच्या शेजारच्या साई कुटीर हॉटेलमध्ये दुसºया टप्प्यातील लेखी परीक्षा देण्यासाठी बोलावले असता कंधारी याने त्याचा साक्षीदार यतीश परशुराम म्हात्रे यास येथे बोलविले.
वडखळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत यतीश, चंदन या दोघांनी या तरुणांकडून ३ लाख १६ हजार रुपये उकळले आहेत. कंपनीत सध्या कोणतीही नोकरभरती सुरू नाही. नोकरीभरतीच्या संदर्भात कोणासही अधिकार दिलेले नाहीत.असे बेकायदा वर्तन करताना कोणी आढळून आल्यास कंपनीच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कं पनीचे जनसंपर्क अधिकारीआत्माराम बेतकेकर यांनी के ले आहे.