पेणमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ८१ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 02:29 AM2019-12-28T02:29:55+5:302019-12-28T02:30:21+5:30
पंचायत समितीचा टंचाई कृती आराखडा १ कोटी १८ लाखांचा
पेण : आडात भरपूर प्रमाणात पाणी असूनही सक्षम वितरण प्रणालीच्या कमतरतेमुळे पेणच्या खारेपाटातील जनतेला नव्या वर्षातही पाणीटंचाईच्या शुक्लकाष्टास सामोरे जावे लागणार आहे. नव्या वर्षात नव्या संकल्पाची मुहूर्तमेढ केली जाते. मात्र, २०२० वर्षातही पेणमधील पाणीटंचाईच्या उपाययोजनेसाठी टंचाईग्रस्त ६४ गावे, १७० वाड्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ८१ लाख रुपयांची नव्या वर्षात तरतूद केली आहे.
पेण पंचायत समितीचा पाणीटंचाई कृती आराखडा एक कोटी १८ लाख इतक्या रकमेचा असून, या उपाययोजना नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यानंतर सुरू होणार असल्याचे एकंदर चित्र दिसत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पेणवासीयांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. ‘धरण उशाला, कोरड घशाला’ ही समस्या दोन दशकांपासून कायमची आहे. खारेपाटातील वाशी विभाग, वडखळ विभागातील २७ गावे ४३ वाड्यांसह, आदिवासी, कातकरी, वाड्यांवर पाणीटंचाईला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. एकूण ६४ गावे १७० वाड्यांवर फेब्रुवारी महिना संपताक्षणी पाणी मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते. पंचायत समिती प्रशासनाकडून पाणीटंचाईच्या समस्या लक्षात घेऊन टंचाईगस्त गावे व वाड्यांसाठी उपाययोजना म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ८१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय विंधन विहिरी बांधण्यासाठी चार गावे ६३ वाड्यांसाठी ३७.५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. उपाययोजना करण्यात आलेली ६८ गाव आणि २३३ वाड्या मिळून एकूण ३०१ उपाययोजनेतील गाव व वाड्यांची संख्या आहे.
पेण, वाशी, वडखळ, खारेपाटासाठी ३० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम या नवीन वर्षाच्या मे २०२० अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही टंचाईची समस्या लक्षात घेऊन पंचायत समिती प्रशासनाकडून पाणीटंचाईच्या उपाययोजना म्हणून एक कोटी १८ लाख रुपयांची कृती आराखड्यात तरतूद केलेली आहे.