आठ हजार अपघातात २००० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:18 PM2020-02-28T23:18:15+5:302020-02-28T23:19:01+5:30
आठ वर्षांत वाढल्या दुर्घटना; नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज
- निखील म्हात्रे
अलिबाग : वाहनांची सातत्याने वाढत जाणारी संख्या, विविध मार्गावरील धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, भरधाव वेगाने धावणारी वाहने यांचा एकत्रित परिणाम अपघाताला निमंत्रण ठरत आहे. जिल्ह्यात दिवसाला सरासरी तीन अपघात होत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१९ या आठ वर्षांच्या कालावधीत एकूण आठ हजार ९०८ अपघात झाले आहेत. यामध्ये दोन हजार २२६ जणांना मृत्यूने कवटाळले आहे. विविध उपाययोजना करूनही अपघात रोखण्यात म्हणावे तसे यश आले नसल्याने प्रभावी उपाय राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग जात आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाभरात विविध महामार्ग, राज्यमार्ग आणि अंतर्गत जिल्हा मार्गांचे जाळे आहे. या मार्गांवर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत असल्याने अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे, यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलीस वाहनचालकांची तपासणीही करण्यात येते. वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. एवढे प्रयत्न करूनही अपघातांची संख्या कमी करण्यात म्हणावे तसे यश येताना दिसत नाही.
काही पालक आपल्या मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांना दुचाकी घेऊन देतात. कधी-कधी काही मुलांकडे वाहन चालवण्याचा परवानाही नसतो. वाहतुकीच्या नियमांचीही माहिती नसते. त्यामुळे आजची तरुण पिढी अतिवेगाने आणि बेदरकार वाहने चालवतात, त्यामुळे त्यांचे अपघात होतात. त्याला पोलीस यंत्रणा किती पुरी पडणार, असा प्रश्न उदय भोसले या पालकांनी ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित के ला.
जमेची बाजू
जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षात रायगड पोलीस दूरक्षेत्र हद्दीमध्ये रस्ते अपघाताच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे आश्वासक चित्र निर्माण होताना दिसत असले, तरी अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी उपाययोजना करणे गरजेचे आहे. २०१९ या वर्षात जिल्ह्यात ७१८ रस्ते अपघात झाले, त्यामध्ये १६१ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची प्रमुख कारणे
महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालविणे
रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने
रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करणे
कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसºया बाजूला नेणे
धोकादायक वळणे
मद्य पिऊन वाहन चालविणे
७०% निष्काळजीपणे वाहन चालविणे
8% पादचाऱ्यांचा निष्काळजीपणा
7% रस्त्याची सदोष बांधणी
6% खड्डे
9% अन्य कारणे
अपघात कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून विविध उपाययोजना, जनजागृती करण्यात येत आहे; परंतु वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. अपघातांमध्ये प्रामुख्याने तरुणांचा मृत्यू होत आहे अथवा त्यांना अपंगत्व येत आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांचा कोणता हट्ट पुरवायचा, याचा विचार करण्याची खरी गरज आहे.
- अनिल पारस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड
जिल्ह्यात झालेले अपघात
वर्ष अपघात मृत्यू
२०१२ १३९४ ३४२
२०१३ १२५९ ३२१
२०१४ १२६१ ३२८
२०१५ १४२३ ३५७
२०१६ ११५१ २५४
२०१७ ९०४ २३०
२०१८ ७९८ २४४
२०१९ ७१८ १६१