मुरुड तालुक्यासाठी २० कोटींचा निधी प्राप्त; ७२ गावांमधील नुकसानग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:08 AM2020-07-01T00:08:43+5:302020-07-01T00:08:58+5:30

मुरुड शहरात अद्यापपर्यंत रक्कम वाटप झालेले नाही. लोकांनी वादळ झाल्यावर घरातील उडालेले पत्रे व छप्पर स्वत:चे पैसे खर्च करून तयार करून घेतले आहेत.

20 crore fund received for Murud taluka; Assistance to the victims in 72 villages | मुरुड तालुक्यासाठी २० कोटींचा निधी प्राप्त; ७२ गावांमधील नुकसानग्रस्तांना मदत

मुरुड तालुक्यासाठी २० कोटींचा निधी प्राप्त; ७२ गावांमधील नुकसानग्रस्तांना मदत

Next

संजय करडे

मुरुड : रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून मुरुड तहसील कार्यालयास वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी आर्थिक रक्कम प्राप्त झाली आहे. त्यानुसार, मुरुड शहर भाग वगळून तालुक्यातील ७२ गावांना मदत रक्कम वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. घराचे छप्पर, गोठे पूर्णत: अल्प स्वरूपात झालेल्या नुकसानीची चौकशी व कागदपत्रे जमा होताच या वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सात हजार ६८७ नागरिकांना पाच कोटी ९० लाख रुपये वाटप करण्यात आले आहे.

मुरुड शहराचे वाटप हे वीज व नेट नसल्याने नंतर होणार असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. मुरुड शहरात २,५०० नागरिकांचे पंचनामे झालेले आहेत; परंतु अद्यापपर्यंत एकालाही रक्कम प्राप्त न झाल्याने शहरातील नागरिक प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मुरुड तहसील कार्यालयास पूर्ण व अल्प अशा झालेल्या घरांसाठी १६ कोटी ८९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. त्यापैकी लाभार्थी हे १४ हजार ८४६ आहेत. त्यात आतापर्यंत ७ हजार ६८७ नागरिकांना ५ कोटी ९० लाख रुपये वाटप करण्यात आले आहे.

बागायत व फळबागासाठी ३ कोटी २२ लाख रुपये प्राप्त झाले. ४२५ लाभार्थ्यांना ३६ लाख ३ हजार ५०० रुपये वाटप करण्यात आले आहे. बागायती जमिनीसाठी शासन निर्णय हेक्टरी ५० हजार या नियमाप्रमाणे पैशाचे वाटप करीत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.अहिरे यांनी ‘लोकमत’ला दिली. तालुक्यातील एक हजार हेक्टर क्षेत्रापैकी ८,६२५ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.

कृषी विभागावर ताण
१)तालुका कृषी कार्यालयात ३४ जगांपैकी १० जण कार्यरत आहेत, त्यापैकी सात जण तांत्रिक काम करीत आहेत. वरिष्ठ कार्यालयाने अतिरिक्त मनुष्यबळ द्यावे, सध्या आम्ही शनिवार व रविवारीही काम करीत आहोत. नुकसानग्रस्तांना तातडीने रक्कम मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी सांगितले.

वाटप युद्धपातळीवर
२)वादळात दुकान व टपऱ्यांच्या नुकसानीसाठी पाच लाख रुपये प्राप्त झाले असून मच्छीमारांच्या होड्यांच्या नुकसानीसाठी ६ लाख ११ हजार प्राप्त झाले आहेत. कागदपत्रांची पडताळणी केल्यावर हे वाटप करण्यात येणार आहे. मुरुड तालुक्याला वादळग्रस्तांच्या मदतीसाठी २० कोटी २२ लाख ११ हजार रुपये प्राप्त झाले असून, वाटपाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मुरुड शहरात अद्यापपर्यंत रक्कम वाटप झालेले नाही. लोकांनी वादळ झाल्यावर घरातील उडालेले पत्रे व छप्पर स्वत:चे पैसे खर्च करून तयार करून घेतले आहेत. काही लोकांनी उसने पैसेही घेऊन घर दुरुस्तीचा खर्च केला आहे. आता लोकांना प्रतीक्षा आहे की, बँक खात्यात पैसे जमा कधी होणार, यासाठी तहसील कार्यालयाने लवकरात लवकर लोकांच्या खात्यात जमा करावे व शहरी नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाहिद फकजी यांनी केली आहे.

वादळग्रस्तांना मदत देताना, आम्ही प्रथम घरांचे नुकसान झाले आहे, त्यांना प्राधान्य दिले. त्यानंतर बागायती जमीन व टप्प्याटप्प्याने सर्वांच्या बँक खात्यांत रक्कम जमा होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेली रक्कम लवकरात लवकर वाटप करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. - गमन गावीत, तहसीलदार, मुरुड

Web Title: 20 crore fund received for Murud taluka; Assistance to the victims in 72 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.