नेरळ : कर्जत तालुक्यातील उक्रुळ परिसरातील एका अल्पवयीन मुलाने सायकल चोरण्याचा विक्र म केला असून, नेरळ पोलिसांनी या सायकलचोरीचा प्रकार उजेडात आणला आहे. नेरळ, कर्जत, बदलापूर भागातून या अल्पवयीन मुलाने सुमारे २० सायकल चोरून काही सायकल उकु्र ळ तर काही सायकल नेरळ परिसरात ठेवल्या होत्या. नेरळ पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे १८ सायकल ताब्यात घेतल्या असून, गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या बाबत नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० एप्रिल रोजी नेरळ राजेंद्रगुरूनगर येथील संतोष गोविंद शिंगाडे यांनी आपल्या लहान मुलांची सुमारे नऊ हजार रु पये किमतीची सायकल कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात दिली होती. अशा अनेक तक्रारी नेरळ पोलीसठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलीस उपनिरीक्षक रतिलाल तडवी, पोलीस शिपाई वैभव बारगजे, पोलीस नाईक नीलेश निकम, पोलीस शिपाई अमोल पाटील, होमगार्ड राहुल पाटील यांचे पथक तयार करून तपास सुरू केला होता.
त्यानुसार नेरळमधील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तसेच अनेक मार्गाने तपास करत सायकल चोरणारा हा उकु्रळ येथील अल्पवयीन असल्याचा तपास नेरळ पोलिसांनी लावला. त्याला नेरळ पोलीसठाण्यात हजर केले. त्या वेळी त्याने नेरळ, बदलापूर, कर्जत परिसरातून या सायकल चोरल्याचे कबूल केले. त्याने चोरून आणलेल्या तब्बल पाच ते दहा हजारांपर्यंत अशा १८ सायकल, सुमारे दोन लाखांच्या नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. यातील पाच सायकलमालकांचा शोध लागला असून, बाकीच्या सायकल कोणाच्या आहेत हे कळाले नसल्याने कोणाची सायकल हरवली असल्यास नेरळ पोलीसठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन नेरळ पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी केले आहे.