रायगड जिल्ह्यातील २० विद्यार्थांना कोरोनाची लागण; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला शाळा बंदचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 03:38 PM2022-01-05T15:38:55+5:302022-01-05T15:39:42+5:30
coronavirus :विद्यार्थ्यांची प्रकृतिस्थिर आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. तर अन्य विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याने आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- आविष्कार देसाई
रायगड : ज्याची भीती होती तेच झाले. रायगड जिल्ह्यातील तीन शाळेतील २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दोन शिक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच जिल्हाधिकारी यांनी तातडीने जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थ्यांची प्रकृतिस्थिर आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. तर अन्य विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याने आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाड तालुक्यातील विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील १८ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर वरंध येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
कोएसो महाड इंग्लिश मिडीयम स्कूलमधील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. २० विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे एकूण २२ जणांना कोराना झाला आहे.त्यामुळे पालकांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील शाळा बंद करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला असताना रायगड जिल्ह्यामध्ये निर्णय घेण्यास विलंब का केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाताळ आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन नंतर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विविध निर्बंध लावले आहेत. मात्र शाळा बंद करण्याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असे प्रशासनाने जाहीर केले होते.४ जानेवारी २०२२ रोजी महाड तालुक्यातील विन्हेरे न्यू इंग्लिश मिडीयम स्कुलमधील एका विद्यार्थांला त्रास होत असल्याने त्यांची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये त्याला कोरोना झाल्याचे समोर आले.
सर्व विद्यार्थ्यांची चाचणी केली असता महाड तालुक्यातील वरंध येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील सहावीचा एक विद्यार्थ्यी तर विन्हेरे येथील न्यू इंग्लीश मिडीयम स्कूलमधील १८ विद्यार्थी आणि दोन शिक्षकांना कोरानाची लागण झाल्याचे समोर आले आहे. इयत्ता आठवीमधील - ५, इयत्ता नववीमधील-६ आणि इयत्ता दहावीमधील-७ मुलांचा समावेश आहे. तसेच, कोएसो महाड इंग्लिश मिडियम स्कूलमधील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. सध्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोना बाधितांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी यांचे आदेश
५ जानेवारीपासून पहिली ते नववीच्या सर्व शाळा बंद करण्यात येत आहेत. दहावी, बारावीच्या प्रात्याक्षिक आणि अंतर्गत मुल्यमापन हे वेळापत्रकानुसार शाळेत होईल. त्यासाठी कोरोना नियमांचे पालन करणे बंधणकारक आहे. तसेच १५ ते १८ वयोगटाला लसीकरण आवश्यक राहणार आहे.