अलिबाग - तालुक्यातील रांजणखार येथील पीडितेला मांडीवर घेऊन तिची शारीरिक छेडछाड करीत जखमी करणाऱ्या ५३ वर्षीय आरोपी दत्तात्रेय पाटील यास २० वर्षांची सक्तमजुरी व ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा अलिबाग येथील विशेष न्यायालयाने सुनावली आहे. १ जानेवारी, २०१९ रोजी पीडित अल्पवयीन मुलीला मांडीवर घेऊन, आगीसमोर आरोपी शेकत बसला असताना, तिची छेडछाड करून तिला जखमी केले. आरोपी दत्तात्रेय पोसू पाटील (५३, रा. रांजणखार, ता.अलिबाग) याने हे कृत्य केले होते. ही घटना पीडित मुलीच्या कुटुंबीयांना कळताच, त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात आरोपी दत्तात्रेय पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.पोयनाड पोलीस ठाणे यांनी तपास पूर्ण करून, आरोपी दत्तात्रेय पाटील याच्याविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. एस. शेख यांच्या न्यायालयात झाली. या केसमध्ये सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. यामध्ये गुन्ह्यातील फिर्यादी (पीडित मुलीची आई), पीडित मुलगी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली, तसेच मुख्य कोर्ट पैरवी अधिकारी राहुल अतिग्रेयांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी महिला पोलीस शिपाई साळगावकर, महिला पोलीस शिपाई मुळे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला.
न्यायालयाचे आदेशविशेष न्यायालयाने आरोपी दत्तात्रेय पोसू पाटील याला २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली, तर दंडामधून पीडित मुलीला ४० हजार रुपये देण्याचा आदेश पारीत केला आहे.