गणेशभक्तांसाठी २०४३ विशेष बस
By admin | Published: September 4, 2016 03:29 AM2016-09-04T03:29:10+5:302016-09-04T03:29:10+5:30
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या रायगड विभागाकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर
- जयंत धुळप, अलिबाग
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या रायगड विभागाकडून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ३१ आॅगस्ट ते ४ सप्टेंबर या पाच दिवसांत परिवहनच्या २०४३ बसमधून सुमारे १ लाख २ हजार १५० गणेशभक्त कोकणात दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या रायगड विभागाचे नियंत्रक विजय गीते यांनी दिली आहे.
नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त शुक्रवारी ३२७ जादा बसमधून १६ हजार ३५० प्रवासी कोकणात रवाना झाले आहेत. शनिवारी सर्वाधिक प्रवासी कोकणात रवाना होत आहेत. शनिवारी १ हजार ४३९ जादा बसमधून तब्बल ७१ हजार ९५० चाकरमानी गणेशभक्त कोकणात जाणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात एका दिवसातील ही विक्रमी प्रवासी वाहतूक आहे. रविवार, ४ सप्टेंबर रोजी १९० जादा बसमधून ९ हजार ५०० गणेशभक्त कोकणात रवाना होतील. गणेशचतुर्थीच्या दिवशी ५० ते ५५ बसमधून २ हजार ५०० ते २ हजार ७५० गणेशभक्त कोकणात पोहोचणार आहेत.
गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासाकरिता रायगड एसटी विभागांतर्गत ३८४ जादा बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. ३८४पैकी सर्वाधिक १३० बस ११ सप्टेंबर रोजी सुटणार आहेत. श्रीवर्धन आगारातून जिल्ह्यात तब्बल ११७ बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. माणगावमधून ७७, मुरूड आगारातून ६५, रोहा एसटी आगारातून ४१, महाड येथून ४५, अलिबाग आगारातून ३५ तर पेण एसटी आगारातून २ विशेष बस सोडण्यात येणार आहेत.
महामार्गाची खड्डेमय अवस्था पाहता, मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग या ३०० ते ४५० किमीच्या थेट प्रवासात २०४३ बस पाच दिवसांच्या मर्यादित कालावधीसाठी असतील. एसटीमध्ये तांत्रिक बिघाडाची शक्यता विचारात घेऊन, रामवाडी (पेण) आणि इंदापूर (माणगाव) येथे एसटी रायगड विभागाचे विशेष दुरुस्ती पथक तर वाकण (नागोठणे) व पोलादपूर येथे एसटी रायगड विभागाचे विशेष गस्ती व दुरुस्ती पथक २४ तास तैनात ठेवण्यात आले आहे.
जिल्हांतर्गत पर्यायी मार्ग
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून रायगड जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांकरितादेखील पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
१)खोपोली-पालीफाटा-पाली-वाकण-सुकेळी-महाड
२)खोपोली-पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-कोलाड-महाड
३)खोपोली-पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-निजामपूर-महाड
४)खोपोली-पालीफाटा-पाली-रवाळजे-विळे-निजामपूर- करंबळी-ताम्हाणे-मुगवळीफाटा-महाड
५)खोपोली-पेण-वडखळ-सुकेळी-महाड
६)पनवेल-पेण-वडखळ, पेझारी-आय.पी.सी.एल.-नागोठणे-वाकण-महाड
७)पनवेल-पेण-वडखळ-नागोठणे-वाकण
८)वाकण-भिसेखिंड-रोहा-कोलाड-महाड
९)वाकण-भिसेखिंड-रोहा-तांबडी-वाली-तळा-इंदापूर-महाड
१०)माणगाव-मोर्बो-दहिवली-गोरेगाव-लोणेरे-महाड
११)माणगाव-म्हसळा-आंबेत-म्हाप्रळ-मंडणगड, खेड
१२)महाड-राजेवाडी, नातूनगर-खेड या १२ मार्गांचा समावेश आहे.
महामार्गास पर्यायी मार्ग
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पळस्पे (पनवेल) ते इंदापूर (माणगाव) या दुरवस्थेतील महामार्गास टाळण्याकरिता
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-खालापूर पाली-वाकण-माणगाव-महाड व पुढे..
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-पुणे-सातारा उंब्रज-पाटण-चिपळूण मार्गे पुढे..
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-मलकापूर-अंबाघाट मार्गे रत्नागिरी.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-राधानगरी मार्गे कणकवली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-गगनबावडा मार्गे कणकवली व पुढे..
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गे- मुंबई-पुणे-सातारा-कराड-कोल्हापूर-आंबोली मार्गे सावंतवाडी, असे पर्यायी मार्ग कोकणात जाण्याकरिता वाहनचालकांना सुचविण्यात आले आहेत. महामार्गांच्या टोलच्या मुद्द्यावर कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.