उरण : द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी सातत्याने होत असलेले माती उत्खनन आणि मागील पंधरा दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास दरड कोसळली. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली. परंतु, पायथ्याशी वसलेल्या डाऊरनगरमधील रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
दरड पडलेल्या ठिकाणाजवळ २१ कुटुंबे वास्तव्यास आहेत. परंतु, सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. दरड कोसळलेल्या ठिकाणी उरणचे तहसीलदार उद्धव कदम, पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त धनाजी क्षीरसागर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश निकम यांनी भेट देऊन पाहणी केली.
यापूर्वी २० जुलैला कोसळली हाेती दरड
खबरदारीची उपाययोजना म्हणून २१ कुटुंबांचे तूर्तास त्यांच्या नातेवाइकांकडे स्थलांतरण केले असल्याची माहिती उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली. याआधीही २० जुलै रोजी डाऊरनगरजवळ दरड कोसळली होती. त्यावेळी या दरडीच्या टप्प्यातील आठ कुटुंबांचे स्थलांतर केले होते.