आगरदांडा : मुरुड तालुक्यातील महालोर गावातील २० ते २५ वयोगटातील जवळपास २५ मुले केळकर येथे क्रिकेट खेळण्याकरिता पिकअप गाडीने गेली होती. क्रिकेट संपवून पुन्हा महालोर गावी रात्री परतत असताना चढणावरील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. यात २१ जण जखमी झाले. त्यापैकी ६ जण गंभीर आहेत.मुरुड- केळकर येथून क्रिकेट मॅच संपल्यावर २५ तरुणांना घेऊन निघालेल्या पिकअप गाडीला (एमएच ०६ बी. जी. २१४५) महालोर चढावावर अपघात झाला. चालक इत्किप इकबाल दळवी याचा ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. यात २१ जण जखमी झाले. त्यापैकी ६ जण गंभीर आहेत. अपघातानंतर चालक दळवी पळून गेला.अपघाताची माहिती मिळताच महालोर गावाचे सरपंच हरी भाकरे व ग्रामस्थांनी जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.गंभीर जखमींमध्ये काशिनाथ देवजी शिगवण, चंद्रकांत हरी पाटील, गोपाळ पांडुरंग लोढे, गणेश रामा शिगवण, निखील हरिश्चंद्र पाटील, अनिकेत गणपत अदावडे यांचा समावेश असून त्यांना पुढील उपचाराकरिता अलिबाग येथील ग्रामीण रुग्णालय हलविण्यात आले आहे, तर अन्य जखमींवर मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. यात ऋषिकेश सीताराम शिगवण, अनिकेत सुरेश पाटील, नागेश चंद्रकांत पाटील, विठ्ठल हरिश्चंद्र धनावडे, अनिकेत रामचंद्र पानगळे, प्रदीप दगडू अदावडे, साईनाथ लक्ष्मण डिके, श्रेयस राजेश धनावडे, रोहन नरेश भुवड, दीपक सुरेश मोहिते, शशिकांत सखाराम धनावडे, विराज विठ्ठल धनावडे, सुदेश सुरेश अदावडे, प्रवीण दगडू नलावडे यांचा समावेश आहे.डोंगर दऱ्यातील अवघड वळणामुळे होतात अपघातमहालोर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम सुरू आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे याआधीही अपघात झाले आहेत. काही वर्षांपूर्वी महालोर गावात लग्नाचे वºहाड घेऊन मुरुडकडे येत असताना ट्रक दरीत कोसळला होता. यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता.हा रस्ता डोंगर-दऱ्यांतील असल्याने चालकांना दक्ष राहणे आवश्यक आहे. अपघातप्रकरणी चालक इत्किप इकबाल दळवी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुरुडजवळ अपघातात २१ तरूण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:31 PM