- जयंत धुळप
रायगड, दि. 25 - तमाम कोककवासीयांचे गणपती हे आराध्य दैवत. गणेश चतूर्थीच्या दिवशी आगमन होवून, दिड दिवस,पाच दिवस, गौरी विसर्जन, वामनद्वादशी, अनंतचतूर्दशी आणि एकविस दिवसांच्या मुक्कामाअंती बाप्पा आपल्या गावाला परत जातात. या त्यांच्या आपल्या घरच्या मुक्कामात बाप्पांची मनोभावे पूजाअर्चा सेवा करुन त्यांना अत्यंत संतूष्ट करण्याकरीता गरिब असो वा श्रीमंत असो प्रत्येक कोकणवासीय सर्वते प्रयत्न करीत असतो.
त्याच प्रयत्नांचाच एक भाग म्हणजे गणेशआगमनाच्या दिवशी बाप्पाला पहिला नैवेद्य तांदळाच्या उकडीच्या २१ मोदकांचाच असतो. गेल्या कित्येक वर्षांची ही परंपरा आणि प्रथा आहे. याच उकडीच्या २१ मोदकांच्या परंपरेच्या अनुशंगाने आज वेध घेतला असता एक अत्यंत रोचक माहिती उपलब्ध झाली आणि ती म्हणजे रायगड जिल्ह्यात शुक्रवारी गणेशआगमनाच्या दिवशी गणरायांना तब्बल २१ लाख तांदळाच्या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात आला.
वर्षभराच्या तांदळाची सोय बाप्पाच करुन देतारायगड जिल्ह्यात एक लाखा पेक्षा अधिक घरगूती गणपती तर २७५ सार्वजनिक गणपती आहेत. रायगड सह संपूर्ण कोकणात जी भाताची वा तांदळाची शेती होते, ती गणपती बाप्पांच्याच आशिर्वादाने होते आणि आपल्याला वर्षभर तांदूळ कधीही तो कमी पडू देत नाही,अशी श्रद्धा कोकणातील भात पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची अनेक पिढ्यान पिढ्यांची आहे. जो बाप्पा आपल्या वर्षभराच्या तांदळाची सोय करुन देतो, त्याला त्याच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी आपल्या शेतात पिकलेल्या तांदळाच्या पिठाची उकड काढून त्या पासून तयार केलेल्या २१ मोदकांचा नैवेद्य दाखविण्याची ही परंपरा जन्मास आली. या उकडीच्या मोदकात किनाऱ्यावरील नारळाचे खोबरे आणि गूळ यांचे सारण असते. आणि उकडीचा मोदक बाप्पाला खूप आवडतो अशीही मोठी श्रद्धा आहे.