२१ आॅक्टोबर पोलीस हुतात्मा दिन : शहीद पोलीस जवानांना सशस्त्र सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 03:25 AM2017-10-22T03:25:45+5:302017-10-22T03:25:55+5:30
शनिवार, २१ आॅक्टोबर या पोलीस हुतात्मा दिनी सकाळी ८ वाजता रायगड पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर हुतात्मा स्मारकास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून ३७० शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
अलिबाग : शनिवार, २१ आॅक्टोबर या पोलीस हुतात्मा दिनी सकाळी ८ वाजता रायगड पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर हुतात्मा स्मारकास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून ३७० शहीद पोलीस जवानांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी ८७ पोलीस जवानांनी आपल्या बंदुकीतून आकाशात तीन फैरी झाडून हुतात्म्यांना सलामी दिली. या वेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे व पोलीस अधिकारी, कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग या ठिकाणी २१ आॅक्टोबर १९५९ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० जवान गस्त घालत असताना, दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा जणांना वीरगती प्राप्त झाली होती. या घटनेमुळे संपूर्ण भारतभर दु:खाची छाया पसरली
होती.
वीर जवानांनी दाखवलेल्या या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, तसेच आपल्या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २१ आॅक्टोबर हा दिवस संपूर्ण देशात पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो.
>३७० पोलीस अधिकारी व जवानांच्या नावांचे वाचन
२१ आॅक्टोबर १९५९पासून देशरक्षणार्थ शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या बलिदानाच्या स्मृती दरवर्षी २१ आॅक्टोबर रोजी जागृत केल्या जातात.
प्रारंभी पोयनाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जी. एल. शेवाळे, मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या महिला सहायक पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे, महिला सहायक पोलीस निरीक्षक ज्योती कांबळे, सायबर सेल सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब स्वामी यांनी वीरगती प्राप्त झालेल्या एकूण शहीद ३७० पोलीस अधिकारी व जवानांच्या नावांचे वाचन केले.
रायगड जिल्ह्यातील ८ पोलीस अधिकारी व ८७ पोलीस जवानांनी सशस्त्र संचलन करून हुतात्म्यांना मानवंदना दिली. कार्यक्र माचे सूत्रसंचालन सुजाता पाटील यांनी केले.