प्रशांत शेडगे, पनवेलपनवेल तालुक्यातील २१६ शाळाबाह्य मुलांना शिक्षण विभागाने शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. यासाठी काही शिक्षकांवर जबाबदारी देण्यात आल्याचे गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. दुष्काळी परिस्थिती, रोजगाराच्या संधीचा अभाव यामुळे परराज्य व जिल्ह्यातून अनेक मजूर कामाकरिता पनवेल परिसरात येतात. याठिकाणी झोपड्या बांधून मिळेल तिथे काम करतात. मजुरी करणाऱ्या या कामगारांना दोन वेळेचे जेवणही महाग होते, त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न येत नाही. गेल्या महिन्यात शासनाच्या आदेशानुसार पनवेल तालुक्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एकूण ५५६ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळले. त्या मुलांची संपूर्ण माहिती जमा करून ती शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली होती. गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांनी आदई तलावाजवळ राहणाऱ्या एकूण आठ शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आदई येथील राजिप शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्याचबरोबर ४ जुलै रोजी झालेल्या विशेष मोहिमेत २१६ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यास शिक्षण विभागाला यश मिळाले आहे. त्यामध्ये शेतमजूर, बिगारी काम करणारे, वीटभट्टी कामगार, कचरावेचक यांच्या मुलांचा समावेश आहे.
२१६ विद्यार्थी चढले शाळेची पायरी
By admin | Published: August 21, 2015 11:44 PM