कर्जत नगरपरिषद क्षेत्रात २२ इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:56 PM2019-06-19T23:56:32+5:302019-06-19T23:56:56+5:30
कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील २२ इमारती धोकादायक असून त्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत.
कर्जत : कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील २२ इमारती धोकादायक असून त्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वीच नगरपरिषद प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. कर्जत नगरपरिषदेला क दर्जा आहे. पूर्वी नगरपरिषद क्षेत्रात ग्राऊंड प्लस दोन मजली इमारतीची परवानगी होती. त्यामुळे जुन्या इमारती या दोनच मजल्याच्या आहेत. आता नव्याने उभ्या राहत असलेल्या इमारती या सात मजल्यांच्या होत आहे.
नगरपरिषद प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून नगरपरिषद क्षेत्रातील २२ धोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामध्ये सुमारे १४५ ते १५० कुटुंबाचा समावेश आहे. नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाने नगरपरिषद क्षेत्रातील इमारतीची प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक इमारती व त्यामध्ये राहणारे नागरिक यांना महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये नोटीस बजावल्या आहेत.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नित्यानंद सोसायटीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे त्या सोसायटीत सध्या कोणी राहत नाही, मात्र इमारत कोसळल्यास आजूबाजूच्या इमारतीस धोका पोहचू शकतो. काही इमारती धोकादायक असल्याने त्यांना नगरपरिषद प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत, मात्र त्या वरून चांगल्या दिसत असल्याने आजही त्यामध्ये नागरिक राहत आहेत.