अलिबाग : गेल्या दोन दिवस पडलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील २८ पैकी २२ धरणे तुडुंब भरून वाहत आहेत. एक धरण ७५ टक्के भरलेले आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरलेल्या धरणांची संख्याही चार आहे, तर ५० टक्के पाणी भरलेले धरण एकच आहे. पावसाने सोमवारी पुन्हा एकदा जोरदार तडाखा दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.शेतीची कामे ९५ टक्के पूर्ण झाल्याने खरिपाचा हंगाम चांगला जाणार असे संकेत शेतकºयांना प्राप्त झाले आहेत. पावसाची अशीच कृपादृष्टी राहिल्यास भाताचे पीक शेतामध्ये जोमाने डोलताना दिसणार आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यामध्ये लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीमध्ये २८ धरण ेयेतात. फणसाड, वावा, सुतारवाडी, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, कुडकी, पाभरे, संदेरी, वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे, खेरे, अवसरे, भिलवले, कलोते मोकोशी, डोणवत, मोरबे, बामणोली, उसरण ही २२ धरणे शंभर टक्के भरून दुथडी वाहत आहेत तर उर्वरित सहा धरणे लवकरच भरण्याची शक्यता आहे. साळोख ९४ टक्के भरले आहे, त्याखालोखाल श्रीगाव ७८ टक्के, रानिवली ६९ टक्के, कार्ले ५८ टक्के आणि आंबेघर ३३ टक्के भरले आहे. सर्व २८ धरणांची साठवण क्षमता ही ६८.२६१ दलघमी आहे, तर सद्यस्थितीला धरणातील पाणी साठा हा ६३.३४७ दलघमी एवढा आहे. १०० टक्के भरलेल्या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याची माहिती कोलाडच्या लघु पाटबंधारे विभागाने दिली. १ जून ते ३१ जुलै या कालावधीत सरासरी दोन हजार ६७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये तब्बल ३५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील २२ धरणे भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:56 AM