२२५ प्राध्यापक-कर्मचा-यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:59 AM2018-03-07T06:59:01+5:302018-03-07T06:59:01+5:30
कर्जत तालुक्यातील चांधाई येथील यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील १२० प्राध्यापक आणि १०५ कर्मचारी अशा एकूण २२५ जणांना गेल्या १८ महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने या सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.
अलिबाग - कर्जत तालुक्यातील चांधाई येथील यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील १२० प्राध्यापक आणि १०५ कर्मचारी अशा एकूण २२५ जणांना गेल्या १८ महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने या सर्वांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. विविध स्तरावर दाद मागून, न्यायालयाचे निर्णय होवून देखील व्यवस्थापनाकडून पगार दिले जात नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवार ५ मार्चपासून आम्ही महाविद्यालयातच असहकार ठिय्या आंदोलन सुरु केले असल्याची माहिती तासगावकर कॉलेज प्राध्यापक-कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
मुंबई विद्यापीठ, तंत्रशिक्षण संचालनालय आणि एआयसीटीई मान्यताप्राप्त या तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाºयांचे गेल्या १८ महिन्यांचे पगार(वेतन) थकीत असल्याने कामगारांवर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ संस्थाचालकांनी आणली आहे. आपल्या हक्काचे सर्व थकीत वेतन मिळावे म्हणून कर्मचाºयांनी सोमवार ५ मार्चपासून असहकार आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनातून कर्मचारी दिवसभरात केलेल्या कामाचा कोणताही अहवाल प्राचार्यांकडे पाठवणार नाहीत. सातत्याने आपल्या थकीत वेतनासंदर्भात संस्थाचालक व शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कामगारांना न्याय मिळत नाही. झोपेचे सोंग घेतलेले हे शासन व संस्थाचालक कधी जागे होतील हा सर्वात मोठा प्रश्न आमच्यासमोर असल्याचे, यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पी.ए.घोंगे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या २० जानेवारी रोजी मुंबईत आझाद मैदान येथे सहकुटुंब आंदोलन झाले होते. त्यानंतर प्राध्यापकांच्या मुक्ता संघटनेचे अध्यक्ष ए.एस.नरवाडे, तासगावकर कॉलेज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघ यांनी एआयसीटी पश्चिम विभागाचे प्रमुख अमित गुप्ता यांना पोलिसांच्या उपस्थितीत निवेदन दिले होते, परंतु त्यावरही कोणताही निर्णय देण्यात आला नाही. १८ महिन्यांचे थकीत वेतन, पीएफ, नियमित वेतनवाढ शासकीय नियमानुसार मिळणे, अपेक्षित सुविधांचा अभाव, इंटरनेट नादुरु स्त मशिनरी, अपुरे शिक्षण साहित्य आदी मागण्या या प्राध्यापक व कर्मचाºयांच्या आहेत.
मंत्र्यांंच्या दालनात आंदोलन करणार
च्आंदोलन करण्याची वेळ संस्था चालकांनी आमच्यावर आणली आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या होणाºया संभाव्य नुकसानीस आम्ही जबाबदार नाही. या असहकार आंदोलनानंतर आम्ही संबंधित अधिकारी व मंत्री यांच्या दालनात आणि वेळ पडल्यास त्यांच्या घरासमोरही संविधानिक मार्गाने आंदोलन करणार असल्याची पूर्व कल्पना निवेदनातून देण्यात आली आहे.
च्यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पी.ए.घोंगे यांना देण्यात आलेल्या या निवेदनाच्या प्रती कर्जतचे पोलीस निरीक्षक, कर्जत तहसीलदार, मुंबई विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे मुंबई क्षेत्रीय अधिकारी यांनाही देण्यात आल्याचे वाघ यांनी सांगितले.
मी आजच संस्थेच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली असून थकीत पगार येत्या १२ वा १३ मार्चपर्यंत देण्याची भूमिका व्यवस्थापनाची आहे. पगार थकीत राहाण्याचे कारण मला नेमके सांगता येणार नाही. कारण आधीचे प्राचार्य डॉ.ए.बी.प्रसाद हे महाविद्यालय सोडून गेले आहेत. त्यांच्या जागी मी सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. सद्यस्थितीत महाविद्यालयात १ हजार १५० विद्यार्थी आहेत. त्यांचा सुमारे ६० टक्के अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
- पी.ए.घोंगे, प्रभारी प्राचार्य, यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालय