रायगड जिल्ह्यात वाजली 229 शाळांची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:52 AM2020-11-24T00:52:05+5:302020-11-24T00:52:28+5:30
एक लाख २९ हजार विद्यार्थी गैरहजर : ४,४११ शिक्षक-कर्मचाऱ्यांपैकी २१ निघाले काेराेना पाॅझिटिव्ह
आविष्कार देसाई
रायगड : जिल्ह्यातील ६४४ पैकी २२९ शाळांची ठरल्याप्रमाणे सोमवारी घंटा वाजली. एक लाख ३५ हजार ७९७ विद्यार्थ्यांपैकी सहा हजार ६६ विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली तर एक लाख २९ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. महाड तालुक्यातील एकही शाळा सुरू झाली नाही. यातील गंभीर बाब म्हणजे २१ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने पालकांच्या उरात मात्र चांगलीच धडकी भरली आहे.
काेराेनाच्या महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. ऑक्टाेबर महिन्यामध्ये काेराेनाचा आलेख उसळी घेत नसल्याने सरकारने मिशन बीगिन अगेनच्या अंतर्गत टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरळीत करण्यास सुरुवात केली हाेती. त्यामध्ये पर्यटन स्थळे, वस्तुसंग्रहालये, गड-किल्ले, मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा अशांना परवानगी दिली हाेती. तसेच २३ नाेव्हेंबरपासून सरकारने राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला हाेता. दिवाळीनंतर काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ हाेत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला. मात्र महापालिका क्षेत्र वगळून अन्य ठिकाणी शाळा सुरू करण्यास सरकारने राेखले नाही. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काेराेना चाचणी करण्याचे सरकारने सक्तीचे केले हाेेते. रायगड जिल्ह्यातील ६४४ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांपैकी २२९ शाळा-कनिष्ठ महाविद्यालये आज सुरू करण्यात आली. तब्बल सहा हजार ६६ विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली.
‘सहमती हमीपत्र’ महत्त्वाचे
पोलादपूर शहरातील विद्यामंदिर पोलादपूर शाळातील सर्व कर्मचाऱ्यांची ॲन्टिजन चाचणी घेण्यात आली असून अद्याप रिपोर्ट प्राप्त न झाल्यामुळे शाळा भरण्यात आली नसून विद्यार्थ्यांचे व पालकांचे ‘सहमती हमीपत्र’ विद्यालयात स्वीकारले जात आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.