श्रीवर्धनमधील २३ गावे अद्यापही अंधारात; वादळाला ४७ दिवस झाले तरी वीज नसल्याने ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:04 AM2020-07-20T00:04:46+5:302020-07-20T00:05:08+5:30

आमदारांच्या उपस्थितीत महावितरण अधिकाऱ्यांसमोर मांडल्या व्यथा

23 villages in Shrivardhan still in darkness; Villagers angry over 47 days of storm | श्रीवर्धनमधील २३ गावे अद्यापही अंधारात; वादळाला ४७ दिवस झाले तरी वीज नसल्याने ग्रामस्थ संतप्त

श्रीवर्धनमधील २३ गावे अद्यापही अंधारात; वादळाला ४७ दिवस झाले तरी वीज नसल्याने ग्रामस्थ संतप्त

Next

बोर्ली पंचतन : निसर्ग चक्रीवादळामुळे श्रीवर्धन तालुक्यातील सर्वच गावातील वीजयंत्रणा जमीनदोस्त झाल्याने ४६ दिवसांनंतरही २३ गावे अंधारातच आहेत. ज्या गावांचा वीजपुरवठा चालू झाला आहे, तोही सतत खंडित होत असल्याने, बोर्ली पंचतन विभागातील ग्रामस्थांचा संताप वाढत असल्याने, आमदार अनिकेत तटकरे यांनी वीज वितरण अधिकारी यांच्यासमवेत सभा घेतली. यावेळी ग्रामस्थ, आमदार, सरपंच, पदाधिकारी यांच्या चर्चेमध्ये अखेर आठवडाभरात वीजपुरवठा सर्व गावांचा चालू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे रायगडचे अधीक्षक डी.आर. पाटील यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळामुळे वीजयंत्रणा पूर्णत: नेस्तनाबूत झाल्याने श्रीवर्धन तालुक्यातील ८१ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. १९६२च्या सुमारास उभी केलेली वीजयंत्रणा जवळपास सर्वच पुन्हा नव्याने उभी करताना वीज वितरणाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासन वीज दुरुस्तीचे काम करणाºया ठेकेदारांच्या शोधात असताना, काही ठेकेदार काम बघून मागच्या पावलाने परत गेले. मोजकेच ठेकेदार जेमतेम काम करताना दिसत आहेत.

श्रीवर्धनमध्ये ज्या वेगाने वीज पूर्ववत करण्याचे काम व्हायला हवे, त्या अपेक्षेने होताना दिसत नसल्याने ४६ दिवसांनंतरही श्रीवर्धन तालुक्यातील २३ गावांचा वीजपुरवठा करण्याचे काम प्रलंबित आहे आणि ज्या गावात वीजपुरवठा चालू झाला, तो वीजपुरवठा सदोष असल्याने सतत खंडित होत असल्याने ग्रामस्थ वीज वितरणावर संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत आमदार अनिकेत तटकरे यांच्या पुढाकाराने रविवारी बोर्ली पंचतन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये विभागातील गावचे प्रमुख पदाधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी व वीज वितरणाचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली.

यावेळी महंमद मेमन यांनी खंत व्यक्त करताना सांगितले की, श्रीवर्धन तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर, ज्या वेगाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते, ते दुर्दैवाने झाले नाहीत. अधिकारी, खासदार, पालकमंत्री, आमदार यांना बदनाम करण्यासाठी कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. तर शिवसेना उपतालुका प्रमुख सुकुमार तोंडलेकर यांनी वीजपुरवठा लवकर सुरळीत न केल्यास सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा बैठकीत दिला.

अ‍ॅड. मंदार ठोसर यांनी ग्राहकांच्या वीजबिले आकारताना नियमानुसार करावी, अवास्तव बिले येणार नाहीत, याची काळजी वितरणाने घ्यावी, असे सांगितले. या सभेसाठी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासोबतच महम्मद मेमन, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर, नंदू पाटील, दिवेआगर सरपंच उदय बापट, भरडखोल सरपंच दिनेश चोगले, सर्वे सरपंच गुलजार हुसैनी, शेकाप नेते अमन हद्दादी, बोर्ली पंचतन उपसरपंच उत्तम दिवेकर आदी उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा : गप्प बसतो, म्हणून श्रीवर्धनकरांच्या सहनशक्तीची परीक्षा वीज वितरणाने घेऊ नये, ४६ दिवसांनंतरही तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही, हे लज्जास्पद आहे. पुढील आठवडाभरात जर वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर सर्व पक्षीय आंदोलन छेडून श्रीवर्धनकर काय आहेत, याचा प्रत्यय दाखवू, असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकरयांनी दिला आहे.

कार्ले गावात वीज नसल्याने पाणीपुरवठ्यात अडचणी

च्दिवेआगर सरपंच उदय बापट यांनी दिवेआगर येथील काही कामे तात्पुरत्या स्वरूपात केली आहेत, ती पूर्णत्वास न्यावी. भरडखोल सरपंच दिनेश चोगले यांनी दिवेआगर, बोर्ली पंचतन, भरडखोल गावाला पाणीपुरवठा होणाºया कार्ले गावाचा वीजपुरवठा अद्याप सुरू झाला नसल्याने, गावांना पाणीपुरवठा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

च्बोर्ली पंचतन उपसरपंच उत्तम दिवेकर शिस्ते माजी सरपंच रमेश यांनी बोर्ली पंचतन, शिस्ते गावासह ज्या गावांचा वीजपुरवठा चालू झाला आहे, तो सतत खंडित होत आहे, दाब कमी होत असून रात्री उशिरापर्यंत पुन्हा चालू होत नाही. च्ज्या गावांचा वीजपुरवठा चालू झाला आहे, तो असून नसल्यासारखा आहे, याकडेही लक्ष पुरवावे. सरपंच गुलजार हुसैनी यांनी सर्वेकडे अद्याप कामाला सुरुवात झालेली नसल्याबाबत संताप व्यक्त केला.

निसर्ग चक्रीवादळामध्ये वीज व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे, ते पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न सुरू आहेत. खाडीपट्टा असलेल्या भागात भूमिगत वीजवाहिनीसाठी प्रयत्नशील आहोत, पुढेही लागणारा निधी कशा प्रकारे शासनाकडून उपलब्ध करता येईल, यासाठी नियोजन करीत आहोत, एकूणच आता वीजयंत्रणा जवळपास नव्याने उभारावी लागत आहे.
- अनिके त तटकरे, आमदार

आम्ही पूर्णत: आमच्या नियोजनाने चालत आहोत, परंतु वीज व्यवस्थेचे झालेले प्रचंड नुकसान व ते पूर्ववत करताना असलेले मोठे काम सध्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे, पावसामुळे व अन्य तांत्रिक अडचणींमुळे कामास थोडा विलंब होत असला, तरी आतापर्यंत प्रत्येक गावातील नागरिकांनी, विविध संस्थांनी वितरणास मोठे सहकार्य केले आहे, असेच सहकार्य यापुढेही राहावे. पुढील आठवडाभरात आपण सर्व गावांचा वीजपुरवठा कसा चालू होईल, यासाठी नियोजन केले आहे.
- डी.आर.पाटील,

रायगड अधीक्षक वीज वितरण पुढील आठवड्यात वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन

आमदार अनिकेत तटकरे यांनी अधिकाऱ्यांना कामाचे कसे नियोजन असेल, याबाबत माहिती देण्यास सांगितले. यावर अधीक्षक अभियंता डी. आर. पाटील व कार्यकारी अभियंता ए. एम. खांडेकर यांनी तालुक्यातील २३ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. यासाठी ११ एजन्सी व १४० कर्मचारी सतत काम करीत आहेत. पुढील आठवडाभरात सर्व तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: 23 villages in Shrivardhan still in darkness; Villagers angry over 47 days of storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.