अलिबाग : राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग व जिल्हा मार्गावर जिल्ह्यात विविध मार्गांवर ४२ ठिकाणे अपघातप्रवण म्हणून नोंदविण्यात आली आहेत. जिल्ह्यातील रस्ते अपघातांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ मध्ये ७९८ अपघात झाले असून त्यात २३३ व्यक्तींचे बळी गेले आहेत, तर ८६५ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. याच कालावधीत २०१७ मध्ये ७५४ अपघात झाले होते. त्यात १८१ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ६९८ जण जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर परिवहन व पोलीस विभागाने भर द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी दिले.बैठकीस अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, पेण येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग महाडचे उप अभियंता व्ही. आर. बागुल, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे शाखा अभियंता रूपेश सिंगासने, जि.प. बांधकाम विभागाचे अभियंता मृदुला दांडेकर आदी उपस्थित होते.अपघातांची वाढती संख्या चिंताजनक आहे. दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापर करण्यात हलगर्जी, जादा क्षमतेने प्रवासी व मालवाहतूक, बेदरकारपणे वाहन चालविणे, सिटबेल्ट न लावणे, मद्यपान करून वाहन चालविणे, वेगमर्यादा पालन न करणे आदी कारणांमुळे मोठ्या संख्येने अपघात होत असतात. त्यासाठी वाहतूक नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर द्यावा, असे निर्देश सूर्यवंशी यांनी दिले. तसेच नोंदविण्यात आलेल्या ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक बसविणे, रम्बलिंग स्ट्रीप्स बसवणे, सूचना फलक उभारणे आदी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपी चालकांची कसून तपासणीयेत्या ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालविल्याबाबतची कसून तपासणी करावी. वेगमर्यादेचे काटेकोर पालन व वाहतूक सुरक्षा उपाययोजनांचे पालन काटेकोर व्हावे, असे निर्देश देण्यात आले.तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये. त्यासाठी आता पालकांवर कारवाई होत असते, हे ध्यानात घ्यावे.अतिवेगाने वाहन चालविल्यास चालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित होतो. तर मद्यपान करून वाहन चालविल्यास सहा महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबित होतो. त्यानंतरही जिल्हा रुग्णालयातून समुपदेशन व उपचार घेणे आवश्यक असते, अशी माहिती देण्यात आली.
रायगड जिल्ह्यात ७९८ अपघातांत २३३ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:47 AM