कर्नाळा बँकेतील २३७ ठेवीदार 5 लाख विमा रकमेच्या प्रतीक्षेत; अनेक खातेदार लागले देशोधडीला
By वैभव गायकर | Published: April 22, 2024 04:58 PM2024-04-22T16:58:48+5:302024-04-22T16:59:10+5:30
कर्नाळा बँक प्रशासन याबाबत रक्कम बँक ऑफ बडोदाच्या मार्फत वर्ग झाली नसल्याचे वारंवार सांगत आहेत.
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: कर्नाळा बँक बुडीत निघाल्याने अनेक खातेदार देशोधडीला लागले. यांनतर केंद्राने 5 लाखापर्यंत विमा रक्कम खातेदारांना देऊ केली. मात्र अद्यापही जवळपास 237 खातेदारांना विम्याची रक्कम मिळू शकली नसल्याने पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी बँक ऑफ बडोदाचे मुख्य व्यवस्थापक मनीषसिंग ठाकुर यांना पत्र लीहून लवकरात लवकर खातेदारांची अडकलेली विम्याची रक्कम कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी 22 रोजी केली आहे.
कर्नाळा बँकेत 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम ठेवीदारांना परत मिळावे म्हणून संघर्ष समिती पाठपुरावा करीत असताना अद्यापही 5 लाखा पर्यंतची विमा रक्कम खातेदारांना मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्नाळा बँक प्रशासन याबाबत रक्कम बँक ऑफ बडोदाच्या मार्फत वर्ग झाली नसल्याचे वारंवार सांगत आहेत. यामुळे कंटाळलेल्या ठेवीदारांनी समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्याकडे यांच्याकडे तोडगा काढन्याची मागणी केली आहे.
अद्याप पर्यंत 52 हजार ठेवीदारांना पाच लाखाच्या आतील रक्कम परत करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु, अद्यापही काही तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने 237 ठेवीदारांची सुमारे 63 लाख रुपयांची रक्कम बँक ऑफ बडोदा मध्ये अडकली आहे.अनेक खातेदारांची लग्न सराई,मेडिकल कारणास्तव पैशा अभावी अडवणूक होत असताना विम्याची रक्कम अदा करण्यास कोणत्या आधारावर टाळाटाळ केली जाते असा प्रश्न उपस्थित करीत याबाबत आरबीआय कडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती कडू यांनी दिली आहे.
अवसायिकांच्या पत्राला केराची टोपली?
बँक ऑफ बडोदाच्या आपल्या शाखेत कर्नाळा बँकेचे अवसायक बाळकृष्ण कडकदौड यांनी 237 ठेवीदारांचे 63 लाख रुपये विम्यातून त्यांना मिळणे अनिवार्य असल्याने बँकेकडे त्यांनी तसा लेखी पत्रव्यवहार करूनही गेल्या सहा महिन्यात
त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याचा आरोप कडू यांनी केला आहे.